नागपूर : शहरातील मेडिकल रुग्णालयात फरशीवर डोके आपटून दोन दिवसांच्या बाळाला ठार मारणाऱ्या बापाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गिरीश उर्फ महादेवराव गोंडाणे (३२), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी.देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने सोमवारी गिरीशला जन्मठेप व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
माहितीनुसार, गिरीश याचे जुलै २०२१ मध्ये प्रतीक्षासोबत प्रेमविवाह झाला. लग्नानंतर तो प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिला मारहाण करायचा. दरम्यान प्रतीक्षा गर्भवती राहिली. प्रसुतीसाठी तिला अमरावतीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ३० डिसेंबर २०२२ला प्रतीक्षाने बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्याचे गिरीशला कळाले. सायंकाळी गिरीश नागपुरात आला. मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक ४६ मध्ये गेला. मुलाला बघताच त्याने प्रतीक्षासोबत वाद घातला. मुलाला जवळ घेतले. काही वेळाने त्याने मुलाचे डोके फरशीवर आपटले. मुलाच्या डोक्याला इजा झाली.
या घटनेने वॉर्डातील रुग्ण व नातेवाइकांमध्ये खळबळ उडाली. प्रतीक्षाने आरडाओरडा केला . येथील परिचारिका धावल्या.संधी साधून गिरीशने तेथून पळ काढला. बाळाला अतिदक्षता वॉर्डात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अजनी पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करून गिरीश याला अटक केली. तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीाक ए.टी.खंडारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर त्यांला शिक्षा सुनावण्यात आली.