नागपूर: ग्रामीण भागात सुरु असलेल्या मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना व जलस्वराज पाणीपुरवठा योजना टप्पा-2 अंतर्गत 90 टक्केपर्यंत कामे पूर्ण झालेल्या योजनांमधून मार्चअखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांना दिले.
ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा आज पालकमंत्र्यांनी मजिप्राच्या कार्यालयात घेतला. या बैठकीला मुख्य अभियंता सतीश सुशीर, कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर, भंडारा जि.प. कार्यकारी अभियंता मैदमवार, कार्यकारी अभियंता गव्हाणकर, भूवैज्ञानिक श्रीमती माने आदी उपस्थित होते.
कामठी तालुक्यातील रनाळा-येरखेडा राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. भिलगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम 70 टक्केपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. मौदा अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेचे काम 60 टक्क्यापर्यंत झाले आहे. नागपूर पेरीअर्बन योजनेचे काम पूर्ण झाले. 9 हजार ग्राहकांना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे. 18 हजार कनेक्शनची क्षमता असून उर्वरित कनेक्शन त्वरित ग्राहकांना देण्यात येऊन पाणीपुरवठा सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
भंडारा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आराखडा 19-20 करिता 127 गावे व नागपूर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आराखडा 2019-20 करिता 159 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी पुन्हा तपासणी करून आराखड्यात नवीन गावे टाकण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कामठी कॅन्टॉनमेंट पाणीपुरवठा योजनेला येत्या आठवड्यात अंतिम मंजुरी मिळत आहे. कामठी शहर पाणीपुरवठा योजना 27.45 कोटी रुपयांच्या खर्चाची असून या योजनेच्या कामाचे सादरीकरण लवकरच होणार आहे.
