
नागपूर : शहरातील लक्ष्मीनगर चौकात आज अचानक एका धावत्या चारचाकी कारला आग लागल्याने काही काळासाठी परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, MH-31-CS-7311 क्रमांकाच्या पांढऱ्या टाटा इंडिगो कारच्या पुढील भागात शॉर्टसर्किटमुळे आग भडकली.
कारचालक आनंद अंतराम मेश्राम (वय 45, रा. भिलगाव, कामठी नाका क्र. 2) यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. आग लागल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत सुरक्षेच्या दृष्टीने वाहन टोईंग व्हॅनच्या मदतीने रस्त्याच्या कडेला हलवले, त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.








