
नागपूर : उपराजधानी नागपुरात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांनी शहरातील जनजीवन विस्कळीत करण्यास सुरुवात केली आहे. कोणतीही अधिकृत कमतरता नसतानाही सोशल मीडियावर आणि तोंडी पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
अफवा पसरताच नागरिकांनी कोणतीही खातरजमा न करता फ्यूल स्टेशनकडे धाव घेतली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून, काही ठिकाणी वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली आहे. सकाळपासूनच सुरू झालेली ही गर्दी दुपारपर्यंत अधिकच वाढत गेली. घाईगडबडीत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरून घेत असल्याने मागणी अचानक वाढली आणि त्यामुळे अनेक पंपांवरील साठा अल्पावधीतच संपुष्टात आला. परिणामी, शहरातील काही पेट्रोल पंप ‘ड्राय’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या परिस्थितीमुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. ऑफिसला जाणारे कर्मचारी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी तसेच प्रवास करणारे नागरिक यांना इंधन मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये वादविवादाच्या घटनाही घडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करत वारंवार नागरिकांना आवाहन केले आहे की, नागपुरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणतीही टंचाई नसून पुरवठा सुरळीत सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी, असेही प्रशासनाने बजावले आहे.
मनपा, पोलीस आणि पुरवठा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली असून, पेट्रोल पंपांवर शिस्त राखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच इंधन वितरण व्यवस्थित पार पडावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
तथापि, प्रशासनाच्या आवाहनानंतरही नागरिकांमधील भीती आणि असुरक्षिततेची भावना पूर्णपणे कमी झालेली नाही. उलट, वेळ जसजसा पुढे सरकत आहे तसतशी पंपांवरील गर्दी वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर अफवा थांबवणे आणि नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करणे, हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरत आहे.









