Published On : Fri, Dec 14th, 2018

राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले: मा.गो. वैद्य

Advertisement

तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे, असे विधान संघाचे माजी ज्येष्ठ प्रचारक मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले. संघाच्या माजी प्रचारकांनी राहुल गांधींची स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर मा. गो. वैद्य यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तीन राज्यातील विजयामुळे काँग्रेसला राहुल गांधी यांच्या रूपाने मेहनत करणारा नेता मिळाला आहे. ही या पक्षासाठी चांगली बाब आहे. लोकशाहीत दोन प्रमुख पक्ष प्रबळ असणे आवश्यक आहे. कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव लोकशाहीसाठी हितकारक नाही, असे त्यांनी नमूद केले.

कोणताही पक्ष दीर्घ काळ सत्तेत राहू शकत नाही. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती आणि राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होत असते. एखादा पक्ष दीर्घ काळ सत्तेत राहू शकत नाही, हे निकालातून सिद्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवातून भाजपच्या नेत्यांनी काय धडा घ्यावा, असे त्यांना विचारले असता मी त्यांना काय सांगणार? ही त्यांची अंतर्गत बाब आहे असे सांगत वैद्य यांनी अधिक भाष्य करणे टाळले.