Published On : Wed, Jan 29th, 2020

राज्यातील आठ शासकीय तंत्रनिकेतन मध्ये कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम – उदय सामंत

Advertisement

मुंबई: राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या हेतूने राज्यात प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा विभागात तसेच रत्नागिरी व कोल्हापूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे आठ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टप्प्याटप्प्याने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू करावे असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

राज्यातील तंत्रशिक्षण विभागाच्या कामाचा आढावा श्री. सामंत यांनी विधान भवनात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

सर्व शासकीय तंत्रनिकेतन इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
राज्यातील अनेक शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारती या तीस वर्षे जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या सर्व इमारतींच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. हे स्ट्रक्चरल ऑडिट दुसऱ्या विभागाकडून वा अन्य यंत्रणेकडून न करता त्या त्या जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांकडूनच करून घ्यावे असे निर्देशही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिले.

राज्यातील एकही शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा शासनाचा विचार नसून अस्तित्वात असलेली तंत्रनिकेतने बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कौशल्य विकासावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू करावेत व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे निर्देशही मंत्री श्री. सामंत यांनी दिले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ यांच्यासह तंत्रशिक्षण विभागाचे राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक व अन्य अधिकारी उपस्थित होते.