
मुंबई : पवईतील स्टुडिओमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवून खळबळ उडवणाऱ्या रोहित आर्य प्रकरणावरून राजकीय वर्तुळात नवे वादंग निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कारवाईत आर्य ठार झाला असला तरी या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता काँग्रेसनेही या प्रकरणात राज्य सरकारला जाब विचारत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “रोहित आर्यने घेतलेला मार्ग नक्कीच चुकीचा आणि गुन्हेगारी स्वरूपाचा होता. पण त्या दिशेने त्याला ढकलणारे आणि मानसिकदृष्ट्या कोलमडवणारे हे सध्याचं महायुतीचं सरकार आहे.”
सावंत म्हणाले की, राज्यातील अनेक कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे बिले शासनाकडून थकलेली आहेत. जवळपास ८९ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित असून त्यामुळे अनेक कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. “भाजपा–शिवसेना सरकारने राज्याची आर्थिक अवस्था खालावली, पण नेत्यांच्या खिशा मात्र भरल्या,” अशी टीका त्यांनी केली.
त्यांनी पुढे सांगितले की, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, जलजीवन मिशन अशा अनेक विभागांमध्ये कंत्राटदारांना त्यांच्या पैशासाठी दररोज शासनाच्या दारात खेटे घालावे लागत आहेत. “सांगलीतील हर्षल पाटील यांनी १.५ कोटी रुपये थकले म्हणून आत्महत्या केली, नागपूरचे पी. व्ही. वर्मा यांनीही अशाच कारणाने आपले जीवन संपवले,” असे सावंत म्हणाले.
“रोहित आर्यचंही असंच झालं. त्याचे ४५ लाख रुपये शासनाकडून थकले होते. त्याने अनेक वेळा आंदोलनं केली, पुणे पत्रकार संघासमोरही तो आंदोलनात उतरला होता. त्याची प्रेस नोट खरी आहे का, याची चौकशी करावी,” अशी मागणी सावंत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “पोलिसांनी ओलीस मुलांची सुटका करून उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. पण रोहित आर्यला त्या टोकावर नेणारे आणि त्याला मानसिक अडचणीत टाकणारे शासनदेखील तितकंच दोषी आहे.”
सचिन सावंत यांनी एका गोष्टीचं उदाहरण देत सरकारला चपराक लगावली. त्यांनी सांगितले, “एका कथेत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावली गेली. त्याने आईला भेटल्यावर तिच्या कानाला चावा घेतला आणि म्हणाला, ‘तू मला योग्य वेळी थांबवलं असतंस, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती.’ तसंच शासनाने वेळेत कान दिले असते, तर आज रोहित आर्यावर ही वेळ आली नसती,असा टोला सावंत यांनी लगावला.








