Published On : Sun, Jul 14th, 2019

रस्ते नाल्या होतीलच, पण प्रत्येक शेतात शेततळे आधी करा : पालकमंत्री

Advertisement

नागपूर: ग्रामीण भागात रस्ते, नाल्यांची कामे होणारच आहेत, पण प्रत्येक शेतात शेततळे आधी झाले पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी व सचिवांनी शेततळ्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. तसेच पीक विम्यात 98 टक्के प्रिमियम शासन व 2 टक्के प्रिमियम शेतकर्‍याला द्यायचे आहे. सर्व शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.

महालगाव येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कामठी विधानसभा प्रमुख अनिल निधान, तालुका अध्यक्ष रमेश चिकटे, मोबीन पटेल, राजकुमार घुले, सरपंच दीपाली चनेकर, उपसरपंच जिजाबाई निधान, शेषराव वानखेडे, नारायण मुळे, अंताराम ठाकरे, अनिल घोडमारे भगवान निधान आदी उपस्थित होते.

उपस्थित नागरिकांच्या आणि महिलांच्या समस्यांची निवेदने स्वीकारल्यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी ती निवेदने संबंधित अधिकार्‍यांकडे पाठविली. ज्या समस्या आठ दिवसात सुटण्यासारख्या होत्या त्या त्वरित सोडविण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रत्येक विभाग प्रमुखाने महालगाव आणि 11 गावांमध्ये झालेल्या कामांची माहिती दिली. तहसिलदारांनी शेतकरी सन्मान योजनेची माहिती सांगितली. वर्ग 2 ची वर्ग 1 मध्ये 11 गावातील 1232 शेतकर्‍यांनी नोंदणी करण्यात आली. 3690 नागरिकांना अन्न योजनेचा लाभ मिळत आहे. तसेच पालकमंत्री पांदन योजनेतून 26 रस्त्यांचे माती काम पूर्ण झाले आहे.

गटविकास अधिकार्‍यांनी कामठी तालुक्यात राबविण्यात येणार्‍या शासनाच्या 52 योजनांची माहिती सांगितली. सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेल्या 1600 कुटुंबांना या योजनांचा लाभ मिळत असल्याचे सांगितले. वृक्षलागवडीसाठी 11 गावात 3400 रोपे देण्यात आली. नरेगा योजनेतून 300 विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. सर्व शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा पीक विमा काढावा. विम्याचे फक्त 2 टक्के प्रिमियम शेतकर्‍याला भरायचे आहे. उर्वरित 98 टक्के शासन भरणार आहे. यामुळे पिकांना संरक्षण मिळणार आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे. यामुळे गावातील पाणी गावातच राहील. सचिवांनी यासाठी पुढाकार घेऊन लोकांना प्रवृत्त करावे. जलसंधारणाच्या कामासाठी आजच घराबाहेर पडा अन्यथा आगामी काही वर्षात आपल्याला वाळवंटाचा सामना करावा लागणार आहे, अशी भीतीही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. महावितरणने आपल्या कामाचा आढावा सादर करताना 70 ते 80 कोटींचे 220 केव्हीचे उपकेंद्र सुरु केले आहे. जिल्ह्यात एकहजार कोटींची कामे सुरु आहेत. त्यात 35 नवीन उपकेंद्रे आहेत. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्यातील वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी व अपघात स्थळे निर्मूलनासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध होत असल्याची माहिती दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र रस्त्यांच्या कामात उदासीनता दाखविली असल्याचे या आढाव्यावरून लक्षात येते. या भागातील 8 रस्त्यांसाठी शासनाने निधी दिला पण एकाही रस्त्याचे काम अजून सुरु झालेले नाही. नॅशनल हायवेबद्दल सर्व नागरिकांनी तक्रारी केल्या. 12 जण दगावले असूनही नॅशनल हायवेचे अधिकारी वाहतूक आणि रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याचे सांगण्यात आले. या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी दिलेल्या प्रत्येक निवेदनावर कारवाई होणार असल्याचे शेवटी पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.