Published On : Thu, Mar 11th, 2021

नाग, पिवळी व पोहरा नद्यांचे नदी स्वच्छता अभियान लोकसहभागातून : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

नदी व नाल्यांच्या साफ सफाई संदर्भात महापौरांनी घेतली आढावा बैठक

 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी व नाल्यांची साफसफाई केली जाते. यावर्षी सुद्धा पावसाळा सुरू होण्याआधीच मनपाद्वारे लोकसहभागातून नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून या अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप देण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. बुधवारी (ता. १०) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये शहर अंतर्गत येणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी तसेच नाल्यांच्या साफसफाई संदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.

बैठकीत उपमहापौर मनिषा धावडे, माजी आमदार अनिल सोले, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक नरेंद्र वालदे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुपारे, नद्या व सरोवरे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराइल, उज्ज्वल लांजेवार, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त सुषमा मांडगे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर व मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राउत, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त साधना पाटील, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, ग्रीन विजीलचे कौस्तुभ चॅटर्जी आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दहाही झोनच्या सहायक आयुक्तांकडून यावर्षीच्या नदी स्वच्छता अभियानासंदर्भात माहिती घेतली. तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नदी व नाल्यांची साफसफाई योग्य रितीने होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. नदी स्वच्छता अभियान राबविण्याकरीता शासकीय, निम शासकीय, खासगी विभाग तसेच शहरातील विविध सामाजीक संस्थांशी संपर्क साधून त्यांचे सहकार्य घेण्याची सूचनाही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबंधित अधिकाऱ्याना केल्या.

महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पवसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमात वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. सोबतच या तिनही नद्यांच्या काठावर पावसाळ्याच्या सुरूवातीला जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना झाडे लावण्याकरिता प्रोत्साहीत करण्याचे आदेशही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नद्यांचे उपभाग करण्यात आले असून यामध्ये प्रत्येकी १ उपअभियंता व १ सी.एस.ओ. लावण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. तसेच जनप्रतिनिधी, एन.जी.ओ.सुध्दा या कामात सहभागी होतील. तसेच नाल्यांची सफाई लवकरात-लवकर सुरु करण्याचे आदेश दिले.

 

नदी स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करा : माजी आमदार अनिल सोले

यावेळी उपस्थित माजी आमदार अनिल सोले म्हणाले, नागनदी, पिवळी नदी, पोहरा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे यावर्षी नदी स्वच्छता अभियान राबवितांना नदीच्या काठावर वास्तव्‍यास राहणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच या अभियानात शहरातील विविध सामाजिक संस्थाची मदत घ्यावी. झोन सभापतीच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता, प्रभारी, वार्डचे अधिकारी एकत्र येउ नदी स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्याची सूचना यावेळी माजी आमदार अनिल सोले यांनी दिली. तसेच महापौर दयाशंकर तिवारी यांचे कौतुक करत माजी आमदार अनिल सोले म्हणाले की, महापौर दयाशंकर तिवारी यांनी खूप कमी दिवसात चांगले नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतले.

 

नदीकाठावर होणार वृक्षारोपण

नदी स्वच्छता अभियानासोबतच यावर्षी तीनही नद्यांच्या काठावर वृक्षरोपण करण्यात योणार आहे. वृक्षरोपणाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरा नदीपासून सुरूवात केली जाणार असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. यामध्ये फळ, औषधींची झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच वृक्षरोपणात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी स्मृती वृक्ष, ग्रह उद्यान, नक्षत्र उद्यान, वन औषधी, फळ वृक्षारोपण जून महिन्यापासून करण्याच्या सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केल्या. त्यांनी सांगितले की वृक्षांचा पालकत्व देण्यात येईल. नागरिकसुध्दा वृक्षांचे जतन व संवर्धन करतील.

नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नाग, पिवळी व पोहरा नदीचे भाग करण्यात आले आहे.

नाग नदी

१.               अंबाझरी तलाव ते पंचशील चौक

२.               पंचशील चौक ते अशोक चौक

३.               अशोक चौक ते सेंट जेविअर स्कूल

४.               सेंट जेविअर स्कूल ते पारडी ब्रिज (भंडारा रोड)

५.               पारडी ब्रिज ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)

पिवळी नदी

१.               गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहन घाट

२.               मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पुलिया

३.               कामठी रोड पुलिया ते जुनी कामठी रोड पुलिया

४.               जुनी कामठी रोड पुलिया ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)

पोहरा नदी

१.               सहकार नगर ते नरेंद्र नगर पुलिया

२.               नरेंद्र नगर ते पिपळा फाटा

३.               पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगांव