Published On : Sat, Apr 10th, 2021

नागपुरात रविवारपासून लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान

नागपूर : दरवर्षी नागपूर महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी व नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. यावर्षी रविवारी (ता. ११) रोजी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ होणार असून नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदीतून गाळ उपसण्यात येणार आहे.

नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ अशोक चौक स्थित नाग नदीच्या पात्रातून करण्यात येईल. पिली नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नारा घाट येथून तर पोहरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सहकार नगर घाट येथून करण्यात येईल. या तीनही कार्यक्रमाला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्यासह अन्य पदाधिकारी व संबंधित भागातील नगरसेवक उपस्थित राहतील.

नदी स्वच्छता अभियान राबविण्याकरिता शासकीय, निमशासकीय, खासगी विभाग तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरणार नाही.