आतापर्यंत ८४ नाल्यांची स्वच्छता : ३१ मे पूर्वी संपूर्ण स्वच्छता कार्याचे उद्दिष्ट गाठण्याचा मानस
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने १२ एप्रिलपासून नदी व नाले स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी शहरातून वाहणा-या नद्या आणि नाले पूर्णपणे स्वच्छ व्हावेत यासंबंधी मनपा प्रशासक व आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनीही आवश्यक निर्देश दिले आहेत. एकूणच नदी व नाले सफाई अभियान प्रगतीपथावर असून २२७ नाल्यांपैकी आतापर्यंत ८४ नाल्यांची स्वच्छता झालेली असून ३१ मे पर्यंत संपूर्ण अभियान पूर्णत्वास नेण्याचा मानस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी नदी स्वच्छता अभियान दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यात अभियान सहा उपभागामध्ये राबविण्यात येणार असून दुसरा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी ०.८ – १.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येते. यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येणार आहे. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. पिवळी नदीची लांबी १७ किमी, नाग नदीची लांबी १७.७५ किमी आणि पोहरा नदीची लांबी १२ किमी आहे. नदी स्वच्छता अभियान प्रत्येक वर्षी लोक सहभागातून राबविण्यात येते. अभियानात गैर शासकीय संस्थांचे सुद्धा सहकार्य मिळते. यावर्षी सुद्धा नागपूर सुधार प्रन्यास तसेच मनपातील कंत्राटदार यांचेकडून प्राप्त होणा-या पोकलेन व टिप्पर व्दारे करण्याचे नियोजीत आहे.
नदया व्यतिरिक्त हत्तीनाला गड्डीगोदाम, बाळाभाऊपेठ, बोरीयापूर, डोबीनगर, लाकडीपूल, तकीया, नरेंद्रनगर, बुरड नाला आदी मोठे आणि इतर छोटे असे एकूण २२७ नाले शहरात आहेत. त्यापैकी मनुष्यबळाद्वारे १५४ व मशीनद्वारे ७३ नाल्यांची सफाई करण्यात येते. सद्यस्थितीत मनुष्यबळाद्वारे ७१ आणि मशीनद्वारे १३ असे एकूण ८४ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. मनुष्यबळाद्वारे १२ व मशीनद्वारे ७ नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. नाले सफाईच्या कामासाठी मनपाचे ७ जेसीबी, पोकलँड कार्यरत आहेत. मनुष्यबळाद्वारे ७१ आणि मशीनद्वारे ५५ नाल्यांची सफाई शिल्लक असून शहरातील सर्व २२७ लहान मोठे नाल्यांची सफाई मान्सूनपूर्णी ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचा मनपाचा मानस असल्याचेही घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगतिले.