अमोल मिटकरींसह ‘त्या’ दोन मंत्र्यांच्याही कृतीचा नोंदविला निषेध
नागपूर: भर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार चुकीच्या पद्धतीने गोष्टी सांगून पुजाऱ्यांची खिल्ली उडवितो आणि त्यावर मंचावर उपस्थित दोन मंत्री बेशरमासारखे हसतात, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. स्वत:च्या धर्माची खिल्ली उडविणे हे राष्ट्रीय कार्य म्हणून मिरविणाऱ्या राष्ट्रवादीच्या या आमदाराने आणि मंत्र्यांनी हिंमत असेल अशीच भर सभेतून इतर धर्माच्याही पुजारी आणि मौलवींची खिल्ली उडवून दाखवावी. असे त्यांनी केल्यास ते एका बापाची औलाद समजू, अशी जळजळीत प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली.
एका सभेत मंचावरून बोलत असताना आमदार अमोल मिटकरी पुजाऱ्यांची खिल्ली उडवित असताना त्याच मंचावर बसलेले मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे मात्र बेशरमासारखे हसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण कृत्याचा भाजपा नेते माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून निषेध नोंदविला.
या कृत्याचा समाचार घेताना ते म्हणाले, राज्याचे दोन मंत्री पुजाऱ्यांची खिल्ली उडवत असताना बेशरमासारखे हसतात. यापेक्षा दुसरे दुर्दैव या महाराष्ट्रात राहिलेले नाही. सत्तापक्षातील एक आमदार चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी सांगतो. हनुमान स्तोत्र असल्याचे सांगून रामरक्षामधील स्तोत्र म्हणतो. हे सर्व करताना तो निलाजरेपणाची हद्द ओलांडतो आणि त्याला मंचावरील दोन मंत्री साथ देतात, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. स्वत:च्या धर्माची खिल्ली उडविणे हे राष्ट्रीय कार्य आता राष्ट्रवादीच्या नालायक लोकांनी सुरू केले असल्याचे स्पष्टपणे लक्षात येत आहे. या नालायक प्रवृत्तीच्या लोकांच्या अंगामध्ये थोडी जरी धमक असेल तर या देशातील उर्वरित दोन धर्मांच्या पुजाऱ्यांबद्दल, मौलवींबद्दल असेच उघडपणे त्यांनी मंचावरून बोलून दाखवावे. त्यांनी असे बोलून दाखविल्यास ते एका बापाची औलाद असल्याचे आम्ही समजू, असेही ते म्हणाले.