Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 6th, 2020

  प्रलंबित प्रकल्पांचा प्रवीण दटके यांनी घेतला आढावा

  नागपूर : महानगरपालिकेच्या प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी., पी.पी.पी. केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी शनिवारी (ता.४) आढावा घेतला.

  प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात महापौरांद्वारे प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे. शनिवारी (ता.४) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, समितीचे सदस्य जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, लेखाअधिकारी श्री. अंनत मडावी, सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमने, कार्यकारी अभियंता सर्वश्री अमीन अख्तर, गिरीश वासनिक, मनोज गणवीर, ए.एस.मानकर, धनंजय मेंढुलकर, रामचंद्र खोत, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, नाग नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल यांच्यासह संबंधित प्रकल्पांचे कन्सल्टंट उपस्थित होते.

  बैठकीत एल.ई.डी. विद्युत दिवे, सीमेंट काँक्रीट रस्ते टप्पा १,२,३, सीमेंट रस्ते जंक्शन पॉईंटचा विकास, डी.पी. रस्ते केळीबाग, रामजी पहेलवान रस्ता, जुना भंडारा, पारडी, सोमलवाडा, रमना मारोती रस्ते, बांधकाम प्रकल्पांतर्गत ऑरेंज सिटी स्ट्रीट, बुधवार बाजार महाल, बुधवार बाजार सक्करदरा, कमाल टॉकीज जवळील प्रकल्प, टाउन हॉल, नवीन गांधीबाग झोन कार्यालय, स्व.प्रभाकरराव दटके रुग्णालय महाल, बाळासाहेब ठाकरे स्मारक चिटणीसपुरा, शाहु वाचनालय चिटणीसपुरा, महाल मासोळी बाजार, डीक दवाखाना, आयसोलेशन हॉस्पीटल, यशवंत स्टेडीयम आदी प्रकल्प, गांधीसागर, नाईक, सोनेगाव, लेंडी तलाव, नाग नदी प्रकल्प, पर्यावरणपूरक दहनघाट, एल.पी.जी. शववाहिनी (पुण्याच्या धर्तीवर) ब्रिकेट्सद्वारे शवदहन, मनपा बॉटलींग प्रकल्प, साने गुरूजी शाळा (सायन्स प्रकल्प) राहतेकर वाडी, अमृत योजना आदी प्रलंबित प्रकल्पासंबंधी चर्चा करून समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी आढावा घेतला.

  याप्रसंगी समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी काही प्रकल्पांच्या कामाबाबत आवश्यक निर्देशही दिले. एल.ई.डी. विद्युत दिव्यांबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे. त्यामुळे या विषयावर कायदेशीर बाबींची पडताळणी करूनच निर्णय घेण्यात यावा. याशिवाय संबंधित विभागातर्फे भूमीगत विद्युत वाहिनीचे काम व वाहतूक सिग्नलची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्षांनी दिले. सीमेंट काँक्रीट रस्ते संदर्भात स्थायी समिती सभापतींद्वारे पाहणी दौरा करण्यात येणार आहे. मासोळी बाजार प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. यादृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

  पर्यावरण पूरक दहन घाटाच्या अनुषंगाने मनपातर्फे शहरातील अंबाझरी, मोक्षधाम, सहकारनगर, मानकापूर या दहन घाटांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ब्रिकेट्सद्वारे शवदहनाबाबतही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून मागील महिन्यात ब्रिकेट्सद्वारे २३३ शवदहन करण्यात आले आहेत. तसेच एल.पी.जी. शववाहिनीबाबात ही आवश्यक सर्व कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली.

  मनपाच्या बॉटलींग प्रकल्पासंदर्भात सर्व त्रुट्या दूर करून ७ जानेवारीला बैठक आयोजित करून त्यात सर्व सविस्तर माहिती सादर करणे. साने गुरूजी उर्दू माध्यमिक शाळेतील सायन्य प्रकल्प हा शहरातील शिक्षण क्षेत्रातील महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यासंदर्भात भेडसावणा-या अडचणी सोडविण्यासाठी ८ जानेवारीला शाळेमध्येच बैठक घेण्यात येईल, असेही समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी निर्देशित केले.

  कविवर्य सुरेश भट सभागृहासंदर्भात पॅनल प्रक्रिया पूर्ण करा

  रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहातील देखरेख व्यवस्थेमध्ये अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. सभागृहामध्ये आवश्यक ध्वनी, विद्युत व्यवस्था तसेच भोजन व्यवस्थेबाबत एक नियोजित प्रक्रिया असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागातील तज्ज्ञांची एक पॅनल निर्धारित करण्यात यावी. यासाठी आवश्यक पॅनल प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, असेही निर्देश समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145