नागपूर:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दुपारी नागपूरच्या खामला परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयावर टाकलेली आकस्मिक धाड प्रशासनात मोठी खळबळ माजवून गेली. अचानकपणे कार्यालयात प्रवेश करताच, बावनकुळे यांनी एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये सापडलेली रोख रक्कम पाहून संताप व्यक्त केला आणि तात्काळ पोलिसांना पाचारण केले.
राज्यातील महसूल विभागात रजिस्ट्री प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे सत्र सुरू असल्याच्या तक्रारी बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यानंतर कोणतीही सूचना न देता त्यांनी थेट कार्यालयात धडक दिली. तपासादरम्यान अतुल कपले या अधिकाऱ्याच्या टेबलवरील ड्रॉवरमध्ये पैसे आढळले.
या प्रकरणात बावनकुळे यांनी चौकशीदरम्यान स्पष्ट केलं की, “रजिस्ट्री प्रक्रिया ऑनलाईन झाली असली तरी, काही अधिकारी आणि एजंट यांच्यामार्फत अजूनही पैशांची मागणी सुरू आहे. हे सहन केलं जाणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं, “महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात जर कोणी पैसे मागत असेल, तर नागरिकांनी मला थेट व्हॉट्सअपवर (९०४९४४०४०) कळवावं. मी स्वतः कारवाई करीन.”
या धाडीदरम्यान बावनकुळे यांनी तात्काळ पोलिसांना बोलावून पैशांचा स्त्रोत व व्यवहारांची माहिती मिळवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीस लाखांवरील काही व्यवहार आयकर विभागाला न कळवल्याचेही उघड झाले आहे.
बावनकुळे यांची ही धाड ही पहिली नाही. यापूर्वीही त्यांनी सावनेर आणि अमरावती येथे अशाच प्रकारच्या कारवाया करत भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पाऊले उचलली आहेत.भ्रष्टाचार कुठेही चालणार नाही, आणि कोणी वाचणारही नाही, असे बावनकुळे म्हणाले.