Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Nov 8th, 2018

  नागपुरात पोलीस उपनिरीक्षकांसोबत वाद घालणे महागात पडले

  नागपूर : पोलीस उपनिरीक्षकासोबत झालेल्या वादाची परिणती एका निवृत्त अधिकाऱ्याला पोलीस कोठडीत जाण्यात झाली. सादिक कुरेशी (वय ५९) असे जरीपटका पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता घडलेल्या या घटनेने जरीपटक्यात तणाव निर्माण झाला होता. फिर्यादी स्नेहल रामदास राऊत (वय ३५) हे पोलीस उपनिरीक्षक असून, ते गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) कार्यरत आहेत. सादिक कुरेशी एका खासगी कंपनीत पीआरओ होते, ते गेल्या वर्षीच निवृत्त झाल्याचे पोलीस सांगतात.

  मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राऊत (वय ३५) हे जरीपटक्यातील मित्राला सोडून आपल्या कारने कर्तव्यावर जात होते. त्याचवेळी सादिक कुरेशी त्यांच्या महिंद्रा जीपने जात असताना दोन्ही वाहने एकमेकांना घासून गेली. परिणामी कारचे नुकसान झाले. राऊत यांनी कार खाली उतरून कुरेशी यांना दिखता नही क्या, कार बराबर चला नही सकते क्या, असे म्हटले. त्यावर कुरेशी यांनीही तुम पुलिसवाले हो तो कुछ भी करोंगे क्या, असे म्हणत राऊत यांच्याशी वाद घातला. त्यांची कॉलरही पकडली. राऊत यांनी मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रण करून जरीपटका पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतले.

  पोलिसांचा ताफा येताच कुरेशी यांनीही रस्त्यावर ठाण मांडले. तुम्ही कशी कारवाई करता, तेच बघतो म्हणत त्यांनी पोलिसांना आव्हान दिले. या प्रकारामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कुरेशी यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. तेथेही काही जण आले. अनेकांनी प्रकरणात समेट घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, राऊत यांनी वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती देऊन कारवाईचा आग्रह धरला. त्यानंतर जरीपटका पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून कुरेशीला अटक केली.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145