Published On : Sat, Dec 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकले सेवानिवृत्त अधिकारी; ७.२५ लाखांची फसवणूक!

सायबर गुन्हेगारांचा सुनियोजित कट, पोलीस असल्याची बतावणी करत धमकावले
Advertisement

नागपूर टुडे – शहरात सायबर गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून सेक्सटॉर्शनच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. अजनी परिसरातील ६० वर्षीय सेवानिवृत्त आरोग्य अधिकाऱ्याला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून सायबर ठगांनी तब्बल ₹७.२५ लाखांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. महिला आणि पोलीस अधिकारी असल्याची बनावट ओळख वापरून पीडिताला मानसिक दबावाखाली आणत ही रक्कम उकळण्यात आली.

व्हिडीओ कॉलमधून जाळ्याची सुरुवात-
मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी पीडिताच्या मोबाईलवर स्वतःला ‘पायल’ असे सांगणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. कॉलदरम्यान ती महिला अर्धनग्न अवस्थेत दिसत होती व अश्लील संभाषण करू लागली. प्रकार लक्षात येताच सेवानिवृत्त अधिकाऱ्याने तात्काळ व्हिडीओ कॉल बंद केला.

Gold Rate
13 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,31,800 /-
Gold 22 KT ₹ 1,22,600 /-
Silver/Kg ₹ 1,88,800/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

व्हॉट्सअॅप कॉल्स आणि धमक्यांचा मारा-
यानंतर संबंधित महिलेने वारंवार व्हॉट्सअॅपवर कॉल करण्यास सुरुवात केली. पीडिताने कॉल स्वीकारले नाहीत, तेव्हा ठगांनी नवा डाव आखला. महिला आणि पोलीस वर्दीतील व्यक्तीचे फोटो, कॉल्सद्वारे ‘अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे’ असे सांगत कायदेशीर कारवाईची भीती दाखवण्यात आली.

पोलीस कारवाई व बदनामीची भीती दाखवून उकळ-
अटक, समाजात बदनामी आणि सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत पीडितावर तीव्र मानसिक दबाव टाकण्यात आला. या भीतीपोटी सेवानिवृत्त अधिकाऱ्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ₹७.२५ लाख रुपये ट्रान्सफर केले.

तक्रारीनंतर तपासाला गती-
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून कॉल डिटेल्स, बँक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

सायबर पोलिसांचे आवाहन-
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्हिडीओ कॉल्स, अश्लील चॅट्स किंवा धमक्यांना घाबरू नये. अशा प्रसंगी तात्काळ कॉल कट करावा, कोणतीही रक्कम ट्रान्सफर करू नये आणि १९३० हेल्पलाईन किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

सावधानता हाच सर्वोत्तम बचाव अनोळखी कॉल्स आणि ऑनलाइन धमक्यांपासून सतर्क रहा.

Advertisement
Advertisement