Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Apr 25th, 2020

  ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा – अजित पवार

  कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील;पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच…

  कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडा;नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे…

  पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले.

  पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

  बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यांची गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

  पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूदर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

  कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक निधी व इतर मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कॅन्टोन्मेंट भागात लॉकडाऊनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यापूर्वी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत व चांगल्या दर्जाचे भोजन पुरवावे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

  कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा तत्पर आणि सक्षम होण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत, असे सांगून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे. गरज भासल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुलाची इमारत व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

  अन्य जिल्ह्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यावा. कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल कौतुक करुन याकामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आहे असे सांगतानाच याबाबत योग्य तो निर्णय होईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले.

  पोलिसांच्या आरोग्याची तपासणी, एन-९५ मास्क, वैद्यकीय सुरक्षा किट व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन देण्यात यावीत असेही अजित पवार यांनी सांगितले.

  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची आणि प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांसोबत बैठका घेऊन नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ससून रुग्णालयाला आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येत असल्याचीही माहिती दिली.

  कॅन्टोन्मेंट भागात महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणारी स्वच्छतेची खबरदारी व अत्यावश्यक साधनसामुग्री पुरवण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली.

  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कोरोनावरील उपचारात सक्रिय खासगी रुग्णालयांना प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आवश्यक ती वैद्यकीय साधनसामग्री पुरवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे असे सांगितले. कोरोना संसर्गाने आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी व त्याअनुषंगाने माहिती दिली.

  पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. अन्य अधिकाऱ्यांनीही त्यांच्याशी संबंधित माहिती दिली.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145