Published On : Tue, Mar 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खाजगी ट्रॅव्हल्सवर निर्बंध; शहरातील कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

Advertisement

नागपूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वायू व ध्वनी प्रदूषणाच्या समस्यांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांनी आदेश जारी करत नागपूर शहरातील इनर रिंगरोड परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सच्या पिकअप-ड्रॉप आणि पार्किंगवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत बंदी लागू केली आहे.

नागपूरची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात पोहोचली असून शहरात अंदाजे २० लाख दुचाकी आणि ५ लाख चारचाकी वाहने रस्त्यावर धावत आहेत. याशिवाय सुरू असलेली विविध विकासकामे यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या परिस्थितीत खाजगी ट्रॅव्हल्स बसचे अनधिकृत पिकअप-ड्रॉप हे कोंडीचे मोठे कारण ठरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

Gold Rate
Mar 232026 - Time 10.20Hrs
Gold 24 KT ₹ 1,40,300 /-
Gold 22 KT ₹ 1,30,500 /-
Silver/Kg ₹ 2,16,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सी.ए. रोड, जाधव चौक, कॉटन मार्केट, व्हेरायटी चौक, वर्धा रोड, अमरावती रोड, उमरेड रोड, कामठी रोड यांसारख्या प्रमुख चौकांमध्ये खाजगी ट्रॅव्हल्सकडून अवैधरित्या प्रवासी उचलणे- सोडणे सुरू होते. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून वारंवार मिळत होत्या.

शहरात विविध मार्गांवरून मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्स बसचे आवागमन होते. वर्धा रोडवरून सुमारे ६४२, अमरावती रोडवरून १९०, जबलपूर रोडवरून २९६, उमरेड रोडवरून ३०८, तर भंडारा रोडवरून ९२ बस दररोज ये-जा करतात. मात्र, या बससाठी अधिकृत पार्किंग किंवा ठराविक पिकअप पॉइंट नसल्याने रस्त्यावरच थांबे घेतले जातात, ज्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.

नव्या आदेशानुसार, इनर रिंगरोड परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सना रस्त्यावर पार्किंग तसेच पिकअप-ड्रॉप पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, शहराबाहेरील रिंगरोड परिसरातही ‘नो पार्किंग’ क्षेत्रात बस उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, काही सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. राज्य परिवहन (एसटी) बस, MIHAN व MIDC परिसरातील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस (परवानगीसह), विवाह किंवा खासगी कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसेस, अॅम्ब्युलन्स, आपत्कालीन सेवा, शालेय बसेस तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला विशेष व देवदर्शन बसेस यांना अटींसह मुभा देण्यात आली आहे.

ही अधिसूचना १३ मार्च २०२६ ते १२ मार्च २०२७ या कालावधीत लागू राहणार असून, नागरिकांनी पर्यायी सुविधा जसे मेट्रो, ऑटो, टॅक्सीचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement