Published On : Wed, Jun 3rd, 2020

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य

नागपूर लाईव्ह सिटी अँप’चे अधिकारी-विभागप्रमुखांना प्रशिक्षण

नागपूर : नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देणे हे मनपाचे कर्तव्य आहे. त्यांनी केलेल्या तक्रारी, मांडलेल्या समस्यांसाठी त्यांनी चकरा मारणे अपेक्षित नाही. यासाठी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अँप नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून तयार करण्यात आले आहे. २४ तासांच्या आत तक्रार ‘ओपन’ करून सात दिवसांच्या आत त्याचे निराकरण आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्याना संबोधित करताना म्हटले.

नागरिकांना घरबसल्या त्यांच्या स्मार्ट फोनवरून एका क्लिक वर तक्रार करता यावी, यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘नागपूर लाईव्ह सिटी’अँप तयार केले आहे. या अँपच्या संचालनासंदर्भात आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तक्रारींचा लवकर निपटारा करता यावा, याकरिता अधिकारी आणि विभाग प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, सुभाष जयदेव, डॉ. रंजना लाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी अँपचे निर्माते प्रशांत मगर यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अँप संदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली. हे अँप नागरिकांच्या सुविधेसाठी असून नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीला युनिक क्रमांक मिळतो. संबंधीत तक्रार २४ तासांच्या आत ओपन करणे आवश्यक आहे आणि सात दिवसांच्या आत सोडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रार सोडविल्यानंतर त्यासंदर्भातील विस्तृत माहिती आणि तक्रारीचे निराकरण केल्याबाबतचे छायाचित्र नागरिकांच्या माहितीसाठी जोडता येईल. हे अँप प्रत्येक नागरिकांसाठी सोयीचे असून नागरिकांनी याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

यावेळी उपस्थित अधिकारी-विभागप्रमुखांनी या ॲप संबधी प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले.