Published On : Tue, Oct 6th, 2020

रमाई आवास योजना लाभार्थींच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावा

Advertisement

नागेश सहारे यांचे महापौर संदीप जोशी यांना निवेदन

नागपूर. नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग ३० मधील नागरिकांनी मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या ‘रमाई आवास योजना’ अंतर्गत अर्ज सादर केले आहेत. मात्र अजूनपर्यंत लाभार्थ्यांना एकही रूपया मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात जातीने लक्ष घालून गरीब व गरजू नागरिकांची अनुदानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करा, अशी मागणी मनपाचे आरोग्य समिती उपसभापती तथा प्रभाग ३० चे नगरसेवक नागेश सहारे यांनी महापौर संदीप जोशी यांना केली.

यासंदर्भात मंगळवारी (६ ऑक्टोबर) नागेश सहारे यांनी महापौरांना निवेदनही दिले. याप्रसंगी खतीजा बी. शेख, सुधाकर पाटील, राधिका रतोने, कल्पना बोरकर, ज्योती ढोंगे, अंजली गौतम, पूजा राऊत, मनीषा सहारे, कैलाश ढोंगे आदी उपस्थित होते.

प्रभाग ३० मधील काही नागरिकांनी शासनाच्या ‘रमाई आवास योजने’अंतर्गत घरकुल मिळावे यासाठी काही वर्षापूर्वी अर्ज सादर केले होते. अर्जधारकांची परिस्थितीत अत्यंत हालाखिची असून त्यांची घरेही जीर्ण झालेली आहेत. जीर्ण घरात कुठलीही जिवीतहानी होउ नये यासाठी नागरिकांना नवीन घर बांधणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पैशाची अडचण असून सर्व नागरिक शासनाच्या ‘रमाई आवास योजने’वरच निर्भर आहेत. मात्र योजनेच्या अनुदानाचा एकही रुपया अद्याप मिळालेला नसल्याने स्थानिक नगरसेवक म्हणून वेळोवेळी त्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांचा निवा-याचा महत्वाचा प्रश्न कायमचा सोडविला जावा, त्यांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी यावेळी मनपाचे आरोग्य समिती उपसभापती तथा प्रभाग ३० चे नगरसेवक नागेश सहारे यांनी महापौर संदीप जोशी यांना केली.