Published On : Tue, Feb 11th, 2020

काशीनगरातील राहिवासीयांनी आठवडी सोमवार बाजार केले बंद

Advertisement

– तणावपूर्ण वातावरणात रहिवासीयांचे आंदोलन

नागपूर. शहरातील दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या रामेश्वरी, काशिनगर येथील सम्राट अशोक कॉलोनीमधील रहिवासीयांना गेल्या अनेक वर्षांपासून वस्तीतील रस्त्यावरच ठिय्या मांडून बसणाऱ्या अनाधिकृत सोमवार बाजाराची समस्या होती.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर महानगर पालिकेतर्फे अनाधिकृत बाजारावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, काशीनगरातील बाजारावर कारवाई होत नसल्याचे पाहून सम्राट अशोक कॉलोनी काशीनगर रहिवासी कृती समिती व सम्राट अशोक कॉलोनी बुद्ध विहार समिती व स्थानिक रहिवासीयांनीच पुढकार घेऊन सोमवार बाजार बसू दिले नाही. सकाळपासूनच वस्तीतील महिलांसह जेष्ठांनी घराबाहेर पडत आदोंलन सुरू करून दुकानदारांना दुकाने लावू दिले नाही. सायंकाळला काही बाजारातील दुकानदार आणि स्थानिक रहिवासी आमरा समोर आले. यानंतर अजनी पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि काही वेळाने मनपा कर्मचाऱ्यांनी येऊन स्थितीला शांत करण्याचा प्रयत्न केले. मात्र, काही दुकानदार आंदोलनाला विरोध करण्यासही पुढे आले.

मात्र, मोठ्या संख्येने असलेल्या महिलांनी पुढाकार घेऊन एकही दुकान लावू दिले नाही. यावेळी सम्राट अशोक कॉलोनी काशीनगर रहिवासी कृती समितीचे अनिता कांबळे, सुनिता मगरे, संध्या पाटील, ज्योती झोडापे, भूपेंद्र बोरकर, डॉ. मधूकर मून, भीमराव मगरे, शिरीष जंगले, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, अमित उपासक, अभय शंभरकर, अमिय पाटील, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदि नागरिकांनी बाजार बंद करण्यास सक्रीय सहभाग नोंदविला.

-गेल्या दहा वर्षांपासून संघर्ष
गेल्या दहा वर्षांपासून काशिनगर येथील सम्राट अशोक कॉलोनी परिसरात दर सोमवारला अनअधिकृत साप्ताहिक बाजार भरत आहे. याबाबत अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक महापौर, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, झोनल अधिकारी, आरोग्य अधिकारी, अजनी पोलिस निरीक्षकांना वारंवार निवेदन आणि तक्रार करूनही निराकरण करण्यात आले नाही. या भागात आठवडी बाजाराने केलेल्या अतिक्रमणामुळे येथील जनतेचे आरोग्यासह गुन्हेगारी घटनांमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

-मोकळ्या जागी बगिचा, वाचनालय, समाज भवनाची मागणी
या बाजारात अवैध पैसे वसूली करण्यात येत होती. सायंकाळला काही गुंड प्रवृत्तीचे लोक महिला-पुरूष सामाजिक कार्यकर्तऱ्यांच्या हाताखाली हे सगळे होत असे. परिसरात नागपूर महानगर पालिकेची मोकळी जागा या ठिकाणी बाजार बसविण्याचा घाट या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु, दाट वस्तीसह रस्त्यांची समस्या असलेल्या या पट्टयात बाजाराऐवजी बगिचा, वाचनालय, समाज भवन, खेळाचे मैदान आदि वास्तूंची गरजेची मागणी रहिवासी सतत करीत आहे. त्या मोकळया जमिनीवर मनपाने या सुविधा निर्माण केल्यास तर स्थानिक नागरिकांना दुसऱ्या प्रभागात सुविधा घेण्यास जावे लागणार नाही.

-गेल्या आठवड्यात असामाजिक तत्वाची दगडफेक
बाजाराचा सोमवार दिवस म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी जीव मुठीत घेऊन जाण्याचा दिवस आहे. घरांच्या दारासमोर बाजाराची दुकाने व ग्राहकांची गर्दी यामुळे अनेकांचे घरातून बाहेर निघणे बंद झाले आहे. स्थानिक नागरिकांना वेळप्रसंगी घरातून गाडी काढणे, प्रसंगी रुग्णाला सेवा पुरविणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी व असामाजिक तत्त्वांमुळे वस्तीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. बाजाराचा सडका भाजीपाला फेकला जातो, कुठेही करण्यात येणारी लघुशंका, धुम्रपान, मद्यपान, शिविगाळी आदींमुळे नागरिक त्रस्त आहेत. याशिवाय चोट्यांसह असामाजिक तत्वांची गुंडगिरी येथे नेहमीच पाहायला मिळते. गेल्या सोमवारी एका घरावर असामाजिक तत्वाने दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे स्थानिक रहिवासीयांनी गोळा होऊन हा बाजारच बंद करण्याचा निर्णय घेतला

-स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष
प्रभाग-33 मध्ये येणाऱ्या काशीनगरात स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष या बाजाराकडे आहे. विरळ वस्तीत लागणाऱ्या या बाजाराचा विरोध असताना नगरसेवकांचीच मुकसमत्ती बाजाराला मिळत होती. नागरिकांनी अनेकदा महानगरपालिका, संबंधित नगरसेवक तसेच पोलिस स्टेशनला तक्रारी केल्या. प्रभागातील गत नगरसेविका सभापती पदावर गेल्यावरही त्यांनीही समस्या सोडविल्या नाही. कोणताही परिणाम होत नसल्याचे पाहून दुकानदारांच्या अरेराव्या वाढल्या होत्या. स्थानिक नागरिक जेव्हा दुकानदारांना हटविण्यास गेले तेव्हा त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार अशी धमकी देण्यात येत होती. मात्र, मनपा प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करण्याच्या हेतूने सम्राट अशोक कॉलोनी काशीनगर रहिवासी कृती समितीने सोमवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेत स्वत:च बाजार बंद केले.