Published On : Mon, Jun 18th, 2018

सांगली बातम्या : अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या : मराठा क्रांती मोर्चा

Advertisement

सांगली : पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल, मुके मोर्चे बोलके होतील; असा गर्भीत इशारा सांगलीत काल पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारला देण्यात आला.

आरक्षणासोबतच इतर मागण्यांबाबतही सरकारने कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही मोर्चाने केली आहे.

भीमा – कोरेगाव दंगलीत हत्या झालेल्या राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी 9 जुलै रोजी पुणे येथे आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

सांगली -मिरज रोडवरील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हा पातळीवरचे नेते उपस्थित होते.

राज्य सरकारने मराठा समाजाच्या महामोर्चानंतर शैक्षणिक सवलत वगळता इतर एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे समाजात सरकारविरुद्ध असंतोष खदखदतो आहे आणि तो सरकारला दाखवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी केली पाहिजे, असे मत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि नेत्यांनी व्यक्त केले.