महापालिका व इक्वी सिटीच्या संयुक्त विद्यमाने तलाव स्वच्छता जनजागृती अभियान
नागपूर : नागपुरातील तलाव म्हणजे आपल्या शहराला लाभलेली नैसर्गिक देणगी आहे. त्याचे सौंदर्यीकरण व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. शहरातील सर्व तलावांची स्वच्छता व सौंदर्य कायम ठेवण्यासाठी नागरिकांची साथ आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून हे काम केले तर तलाव कायम स्वच्छ व सुंदर राहतील, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.
नागपूर महानगरपालिका व इक्वी सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तलाव स्वच्छता जनजागृती अभियान गुरूवारी (ता.२२) ला नाईक तलाव येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वच्छ असोसिएशनच्या अनसुया छाबरानी, शेफाली दुधबेडे, इक्वी सिटीच्या डॉ.अमृता आनंद प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमहापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, शहरातील तलाव एकेकाळी शहराचे वैभव होते. परंतु, नंतरच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे तलावामध्ये अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले. आजच्या परिस्थितीत तलाव हे मृत पावत आहे. लेंडी तलाव व नाईक तलाव हे पूर्वी उत्तर नागपुरातील वरदान होते. पाण्याची मुबलकता होती. परंतु आता त्यामध्ये नागरिकांनी गडरलाईन सोडल्यामुळे तलाव अस्वच्छ झाला आहे. नागरिकांनी यापुढे तलावामध्ये कोणत्याही प्रकारच्या कचरा टाकता कामा नये, त्याचप्रमाणे तलावामध्ये गणपती व देवीची कुठलीही मूर्ती विसर्जन करायची नाही, असा नागरिकांना उपदेश केला. यावेळी प्रदूषण व तलाव स्वच्छता अभियानावर ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली.
यावेळी स्वच्छ असोसिएशनच्या अनसुया छाबरानी व शेफाली दुधबेडे यांनीही तलाव स्वच्छता अभियानावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक शेखर गिरडकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ.अमृता आनंद यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
