रामटेक: गणतंत्र गोंडवाना पार्टीच्या वतीने शांती मंगल कार्यालय बस स्टॉप येथून तहसील कार्यालय रामटेक येथे हरीश उईके व महेश बमनोटे वासुदेव टेकाम माधुरी उईके सुखलाल मडावी गुड्डू उईके यांच्या नेतृत्वाखाली बेधडक मोर्चा काढण्यात आला होता.
देवलापार क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे कर्ज,वीजबिल,शेतसारा सरसकट माफ करावा,मागील वर्षीचा दुष्काळी मोबदला त्वरित मिळावा,देवळापारला नवीन तालुका घोषित करावा,देवळापार येथे आधुनिक पध्दतीचे रुग्णालय तयार करावे,वनहक्क कायदा सन 2006 अंतर्गत व्यक्तिगत व सामूहिक दावे मंजूर करून पट्टे देण्यात यावे,कोर क्षेत्रातील 50 गावांना सिंचन व्यवस्था,रोजगार उपलब्ध करून वन्य प्राण्यांपासून संरक्षण देण्यात यावे.
रामटेक तालुक्यातील बेरोजगाराना रोजगार देण्यासाठी पवनी,देवळापार, वडामबा,हिवराबाजार,करवाई या गावात लघु उद्योग सुरु करण्यात यावे,देवळापार परिसरात उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी,खुमारी टोल नाका परिसरातील 20 ते 25 किमी क्षेत्रातील गावांना टोलपासून मुक्ती देण्यात यावी,वडामबा परिसरात नेहमीच वीजपुरवठा खंडित होत असल्याने तेथे वीज उपकेंद्र निर्माण करण्यात यावे या व इतरही महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी व तहसीलदार नीलिमा रंगारी यांना देण्यात आले.यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने बेधडक मोर्चात सहभागी झाला होता.