Published On : Sat, Aug 26th, 2017

विभाग प्रमुखांचा वर्षभरातील प्रगतीचा अहवाल सादर करा : ​​पालकमंत्री

 

· मेयो सुवर्ण महोत्सवानिमित्त बैठकीत सुचना
· डिसेंबरमध्ये मुख्य कार्यक्रम
· सुधारणा झाल्या तरच निधी

C Bawankule
नागपूर: ​​मेयो हॉस्पिटलमधील विभाग प्रमुखांचा गेल्या वर्षभरातील प्रगतीचा अहवाल सादर करा. तसेच नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाली तरच यानंतर शासन निधीचा विचार करेल, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेयो हॉस्पिटलच्या प्रशासनाला दिला.

मेयोच्या सुवर्ण जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी आयोजित बैठकीत पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. याप्रसंगी या भागाचे आमदार विकास कुंभारे व मेयोचे विभागप्रमुख उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवाच्या तयारी निमित्त या बैठकीत मेयो प्रशासनाने 20 प्रकारच्या विविध विषयांची सुची पालकमंत्र्यासमोर ठेवली. या महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांना या सुवर्ण महोत्सवाचे ‘पॅट्रन’ करण्यात येणार आहे. मेयोतील रस्त्यांच्या सुधारणा, सभागृहातील जुन्या खुर्च्या बदलणे, सुलभ शौचालयाचे काम, सुरक्षा भिंतीसाठी निधी, बगिचा, नविन 500 खाटांचे मेडिसिन ब्लॉक अशा विविध कामांसाठी निधीची मागणी या बैठकीत पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.

मेयोला 50 वर्ष पूर्ण होत असून डिसेंबरमध्ये सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या बैठकीदरम्यानच पालकमंत्र्यांनी विभाग प्रमुखांच्या वर्षभराच्या प्रगती अहवालाची मागणी केली. शासन एवढा निधी खर्च करते तर आरोग्य सेवांची काय प्रगती झाली हे समोर आले पाहिजे, अशी सुचना पालकमंत्र्यांनी दिली. गेल्यावर्षी 26 ऑगस्टला बैठक झाली होती. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल या बैठकीत सादर व्हायला हवा होता.

मागील दोन वर्षात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा दिसत नाही हे सांगतांना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, परिचारिकांची व विभाग प्रमुखांची रूग्णांशी असलेली वागणूक जिव्हाळ्याची दिसत नाही. तसेच सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात आयएमए, खाजगी डॉक्टर्स, आयुर्वेदीक डॉक्टर्स, शासनाचे सर्व रूग्णालय, सर्व संघटना यांना सहभागी करून घ्या व एक मोठा सर्व समावेशक महोत्सव साजरा करा. या शिवाय पालमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य समिती, जिल्हा परिषद अशा सर्वांना या महोत्सवात सहभागी करून घ्या तसेच महोत्सवासाठी शासनाची जबाबदारी काय असेल, मेयोची जबाबदारी काय असेल, मेयोच्या विभागप्रमुखांकडे कोणती जबाबदारी असेल तसा सर्वंकष अहवाल तयार करा. यानंतर पुन्हा दुसरी बैठक घेण्यात येईल, त्या बैठकीत हा अहवाल सादर करा, अशी सुचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी केली.