मुंबई : मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेसंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. मणिपूरमधील या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु असून आज महाराष्ट्राच्या विधीमंडळात या प्रकरणावरून वादंग पाहायला मिळाले.
विरोधी पक्षांमधील महिला आमदारांनी मणिपूर प्रकरणावर बोलण्याची परवानगी मागितली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ही परवानगी नकारल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध नोंदवला. विधीमंडळाबाहेर पडल्यानंतर वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मणिपूरमधील घटनेचा निषेध करत सभात्याग करण्याचे कारणही सांगितले.
मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.त्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितला. परंतु आम्हाला बोलू दिले नाही. त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. यासंदर्भात ठराव व्हावा, अशी भावना आम्ही व्यक्त केली. मात्र आम्हाला बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केल्याचे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
या देशात महिलांचा सन्मान होत नसेल तर मोठे महाभारत घडणार आहे, हे सत्य आहे. आम्ही महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु या विधीमंडळाने आम्हाला एक सेकंदही बोलू दिलं नाही. हीच का आपल्या देशातली लोकशाही? खरंतर ही लोकशाही नव्हे हुकूमशाही आहे, असा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला. दुसऱ्या बाजूला आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला देश कुठे नेऊन ठेवलाय? असा संतप्त सवाल उपस्थित केला.