Published On : Tue, Jul 27th, 2021

कमाल चौक बाजार परिसरातील रस्त्यांची डागडुजी करा : महापौर

Advertisement

– बाजार परिसरात नियमित स्वच्छतेकडे लक्ष देण्याचेही निर्देश : शिष्टमंडळाचे महापौरांना निवेदन

नागपूर : शहरातील आशीनगर झोन अंतर्गत कमाल चौकातील बाजार परिसरामध्ये रस्त्यावर असलेले खड्डे तातडीने बुजविण्याबाबत कार्यवाही करून परिसरात नियमित स्वच्छता रहावी, यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत.

कमाल चौक बाजार परिसरातील समस्यांसंदर्भात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष राजेश हाथीबेड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी (ता.२६) महापौरांची भेट घेतली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबंधित अधिका-यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

याप्रसंगी उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ.गजेंद्र महल्ले, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते.

कमाल चौकातील मनपाच्या बाजार परिसरामध्ये काही दुकानदारांकडून रस्त्याच्या कडेला मांसविक्री दुकान लावण्यात आले आहेत. या दुकानांतून निघणा-या घाणीमुळे परिसरात दुर्गंध पसरते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचीही तक्रार यावेळी राजेश हाथीबेड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली. बाजार विभागामार्फत कमाल बाजाराचा दौरा करून पाहणी करण्यात यावी. या ठिकाणी अवैधरित्या मांसविक्रीची दुकाने आढळल्यास अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

यासोबतच मांस विक्रीच्या दुकानांमधून निघणारी घाण कुठेही टाकली जाउ नये, परिसरात योग्य स्वच्छता रहावी यासाठी मनपाचे स्वच्छता कर्मचारी कार्य करतात. मात्र सदर दुकानदारांनीही आपल्यामुळे कचरा निर्माण होउ नये व त्यातून घाण होउ नये याची काळजी घ्यावी. परिसरात दुकानदारांकडून अस्वच्छता होत असल्याचे निदर्शनास आल्यास उपद्रव शोध पथकाद्वारे नियमीत दंडात्मक कारवाई सुरू करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले.

आशीनगर झोन अंतर्गत आवळे बाबू चौकामध्ये मनपाचे चौक नामाचे फलक कुठेही लावलेले नाही, ते लावण्याची मागणी शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली. चौकाच्या नावाचे फलक लावण्याबाबत वाहतूक विभागाला माहिती देउन ते तातडीने लावून घेण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित सहायक आयुक्तांना यावेळी दिले.