Published On : Wed, Aug 21st, 2019

विद्युत खांबावरील केबल हटवा,अन्यथा कारवाई

Advertisement

मनपाच्या विद्युत विभागातर्फे केबल ऑपरेटर्सना इशारा

नागपूर : नागपूर शहरात असलेल्या विद्युत खांबांवरील केबल ऑपरेटर्स, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे असलेले केबल संबंधित ऑपरेटर्सने हटवावे. अन्यथा मनपा संबंधित केबल काढून केबल आपरेटर्स अथवा कंपन्यांवर कारवाई करेल, असा इशारा मनपा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार, नागपूर शहरात असलेले पथदिवे ही नागपूर महानगरपालिकेची मालमत्ता आहे. नागरिकांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अनेक केबल ऑपरेटर्स, इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या केबल्सला आधार देण्यासाठी या विद्युत खांबाचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे विद्युत खांबांना क्षती पोहचू शकते. नागरिकांनाही यामुळे धोका होऊ शकतो.

त्यामुळे संबंधित ऑपरेटर्सनी विद्युत खांबावर असलेले केबल्स सात दिवसांच्या आत काढावे, अन्यथा नागपूर महानगरपालिकेतर्फे ते हटविण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या नुकसानीस मनपा जबाबदार राहणार नाही, असा इशारा नागपूर महानगरपालिका विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.