Published On : Wed, Apr 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

तप्त उन्हातून दिलासा; नागपुरात सिग्नल चौकांवर ‘ग्रीन नेट’ उभारणीला अखेर हिरवा कंदील

Advertisement

नागपूर : उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना अखेर काहीसा दिलासा मिळणार आहे. शहरातील गजबजलेल्या वाहतूक चौकांवर ‘ग्रीन नेट’ उभारण्याच्या प्रस्तावाला नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा निर्णय झाल्याने आता प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वाखरे यांनी विलंबाची कबुली देत, पुढील उशीर टाळण्यासाठी नव्याने निविदा काढण्याऐवजी मागील वर्षीच्या कंत्राटदारांकडूनच जुन्या दरात काम करून घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. सुमारे ६५ लाख रुपयांच्या या योजनेला महापालिका आयुक्तांची ३० मार्चलाच मंजुरी मिळाली होती; मात्र ती समितीपर्यंत पोहोचायला जवळपास २० दिवस लागले.

या योजनेअंतर्गत शहरातील १८ ते २० प्रमुख सिग्नल चौकांवर ३० एप्रिलपर्यंत ‘ग्रीन नेट’ उभारण्याचे निर्देश वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. पुढील काळात गरजेनुसार या चौकांची संख्या वाढवण्याचाही विचार आहे. सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना कडक उन्हापासून संरक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

दरम्यान, स्थायी समितीने इतर पायाभूत सुविधांनाही मंजुरी दिली. धरमपेठ परिसरातील प्रभाग १३ मध्ये सुमारे ५६.४७ लाख रुपयांच्या रस्ते कामाला मंजुरी मिळाली असून, हे काम अंदाजपत्रकापेक्षा सुमारे ३५ टक्के कमी दरात मंजूर झाले आहे. तसेच लक्ष्मीनगरमधील हॅम्पयार्ड रोडवर १.३६ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण वाहिनी प्रकल्पालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उशिरा का होईना, घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असला तरी, वेळेवर नियोजन करण्यात आले असते तर हा दिलासा आणखी लवकर मिळाला असता, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.