Published On : Wed, Dec 11th, 2019

‘नागपूर सिटी मेयर रिलिफ फंड’च्या नावाने होणार कंपनीची नोंदणी

‘महापौर सहायता निधी’साठी मदत करणा-यांना मिळणार कर सवलत

नागपूर : पैशांअभावी मागे पडणा-या प्रतिभावंत खेळाडू किंवा उपचारापासून वंचित राहणा-यांना ‘महापौर सहायता निधी’द्वारे मदत मिळावी यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी ‘नागपूर सिटी मेयर रिलिफ फंड’ (नागपूर शहर महापौर सहायता निधी) नावाने कंपनी नोंदणी प्रस्तावित आहे. मंगळवारी (ता.१०) झालेल्या ‘महापौर सहायता निधी समिती’च्या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालय सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१०) समिती सदस्य ॲड.संजय बालपांडे यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समिती सदस्य नागेश सहारे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहिम, संदीप सहारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे कन्सल्टंट कंपनी सेक्रेटरी पराग दासरवार, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रादेशिक संचालक जयंत पाठक उपस्थित होते.


शहरातील प्रतिभावंत गरजवंतांना मदत करण्याच्या हेतूने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून ‘महापौर सहायता निधी’ सुरू करण्यात येणार आहे. या सहायता निधी संदर्भात ध्येय धोरणे निश्चीत करण्याकरिता महापौरांद्वारा ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे.

मंगळवारी (ता.१०) झालेल्या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कंपनी कायदा २०१३च्या कलम ८ अन्वये ‘नागपूर सिटी मेयर रिलिफ फंड’ या नावाने कंपनी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. सदर कंपनी ‘नॉन प्रॉफीट मेकींग’ राहणार आहे. कंपनीमार्फत आरोग्य, क्रीडा, शिक्षण आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात येईल. विशेष म्हणजे, आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी पुढे येणा-या हातांना मनपातर्फे विशेष सवलत दिली जाणार आहे. ‘नागपूर सिटी मेयर रिलिफ फंड’साठी मदत करणा-यांना मनपातर्फे कर सवलत देण्यात येईल, अशी कंपनी तयार करणे प्रस्तावित आहे. याबाबत समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.