Published On : Tue, Jun 27th, 2017

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांचे ग्राहकांशी हितगूज


नागपूर: वीज ग्राहकांच्या समस्या एकूण घेत महावितरण संदर्भात त्यांची मतं जाणून घेणे यासाठी महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी लक्ष्मीनगर येथील सायंटीफ़ीक सोसायटीच्या सदस्यांसोबत हितगूज साधत महावितरणशी निगडित अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली, या चर्चेदरम्यान महावितरणच्या एकूणच सेवेप्रति ग्राहकांनी आनंद व्यक्त करीत, महावितरण आता अधिक लोकाभिमूख झाले असल्याची भावनाही व्यक्त केली.

विविध प्रकारच्या वीज समस्या, त्यासंबंधीच्या विषयांवर कुणाशी चर्चा करावी याबाबत सामान्य ग्राहकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो यामुळे साध्या-साध्या समस्या कालांतराने मोठ्या होतात मात्र त्यांचे निराकरण होत नाही, यामुळे ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे महावितरणबाबत त्यांचे मनोगत जाणुन घेतले. याप्रसंगी अतिरीक्त सुरक्षा ठेव, बिलींग, वाहिनी स्थलांतरण, वीजदर, मीटर रिडींग, मोबाईल क्रमांकाची नोंदणी, महावितरण मोबाईल ॲप, कॅश टॅली आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्राहकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवून घेण्याचे आवाहन प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी यावेळी केले. यावेळि कॉग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांचेसह महावितरणचे अधिकारी आणि सायंटीफ़ीक सोसायटिचे किशोर बक्षी, विश्वनाथ निमजे, अरविंद ग़डकिनकर, विलास मानकर, विलास सप्रे, सुनिल अलोणी, गिरीष बडवाईक, सुनिल खरे, भावना खरे, दिपक साखरे आदी उपस्थित होते.

महावितरणने पुढाकार घेत ग्राहकांजवळ येण्याचे काम केले असून यामुळे काही समस्या तातडीने सुटण्यास मदत होईल यासाठी महावितरण कौतूकास पात्र असल्याची प्रतिक्रीया ॲड. सुनिल खरे यांनी यावेळि व्यक्त केली, आपल्या भागात क्वचितच ब्रेकडाऊन होत असतात आणि आत्ता तर त्याची सुचनाही एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना दिल्या जात आहे. ही समाधानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.