Published On : Tue, Jun 27th, 2017

फ्लाय अॅश आधारित बांधकामावर संशोधन व विकासात्मक कार्यासाठी महाजेम्स व जे.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

Advertisement


नागपूर:
विविध स्वरूपाच्या स्थापत्य बांधकामात जुडाई, प्लास्टर कामांमध्ये सिमेंट एवजी चुना, फ्लाय अॅश आणि स्थानिक घटकांचा वापर करून स्थापत्य बांधकाम खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करणे, बांधकाम मुल्य कमी करणे याबाबत संशोधन व विकासात्मक अभ्यास करण्यासंबंधी महाजेम्स आणि जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व व्यवस्थापन नागपूर यांचेमध्ये नुकतेच महाजेम्स प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

महानिर्मितीच्या राज्यातील औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेची उपयोगिता वाढविण्यासाठी महाजेम्सची स्थापना झाली असून उत्तम पायाभूत सोयी-सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, संशोधन व विकासात्मक कार्यासाठी अनुभवी मनुष्यबळ हि जे.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयाची जमेची बाजू आहे. जयदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय अग्रवाल व सचिव अजय अग्रवाल यांनी जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे संशोधनात्मक कार्यास तांत्रिक सहाय्य करण्याकरीता पुढाकार घेतला आहे.

विशेष म्हणजे, ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष चौधरी यांनी पोर्टलँड सिमेंट एवजी फ्लाय अॅशवर आधारित मिश्रणातून जुडाई तसेच इतर बांधकाम याबाबत संशोधनात्मक भरीव काम केले असल्याने निश्चितच त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळेल असा विश्वास महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने यांनी व्यक्त केला.

महाजेम्सचे सुखदेव सोनकुसरे, प्रशांत देशपांडे, पंकज धारस्कर तर जे.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय अग्रवाल, डॉ.सुभाष चौधरी व डॉ.यु.एस.डांगे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.