नागपूर : रेल्वे ट्रॅक ओलांडणे, ट्रॅकवर उभं राहून रील तयार करणं किंवा धावत्या गाडीसमोर सेल्फी घेणं – हे प्रकार केवळ रेल्वे कायद्यानुसार गुन्हा नसून, स्वतःच्या जीवाशी खेळणं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा बलाने या प्रकारांवर कठोर नजर ठेवत जनजागृती मोहिम राबवली आहे, मात्र तरीही काही युवकांमध्ये या प्रकारांची ‘फॅशन’ वाढताना दिसत आहे.
घातक कृत्याचा बळी ठरलेला आकाश राठोड-
१५ मे २०२५ रोजी घंसौर-विनेकी रेल्वे मार्गावरील एका निर्जन परिसरात गाडी क्रमांक ६८८१७ च्या इंजिनला एक युवक धडकला आणि गंभीर जखमी झाला. त्याला त्याचा मित्र नितीन यादव यांनी तत्काळ शासकीय मेडिकल, घंसौर येथे नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे नाव आकाश लालसिंग राठोड (२८ वर्षे) असून, तो जि. नरसिंहपूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी होता. चौकशीत समोर आलं की, तो रेल्वे लाईनवर फोटो व रील बनवत होता, आणि चालकाने हॉर्न दिल्यानंतरही ट्रॅकवरून हटला नाही.
आतापर्यंत ९७ प्रकरण समोर –
फक्त २०२५ सालातच नागपूर रेल्वे मंडळात मेन रन ओव्हरचे ९७ प्रकरणं समोर आली आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ट्रॅकलगत वस्ती व ग्रामीण भागात जनजागृती मोहीम सुरु केली असून, स्थानिकांना सतत सांगितलं जातं की रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं किंवा सेल्फी घेणं, हे कायद्याने गुन्हा असून, जीवावर बेतू शकतं.
जनतेसह प्रसारमाध्यमांनाही आवाहन-
दीपचंद्र आर्य, मंडल सुरक्षा आयुक्त, द.पू.म.रे., नागपूर मंडळ यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, अनधिकृतपणे रेल्वे परिसरात प्रवेश करू नये, ट्रॅक किंवा धावत्या गाड्यांजवळ फोटो अथवा रील घेऊ नये. तसेच सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया प्रतिनिधींनी या मोहिमेच्या प्रसार-प्रचारात सहकार्य करून संभाव्य रेल्वे अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा. ही मोहीम केवळ नियमभंग रोखण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या या लढ्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.