नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी सकाळपर्यंत थांबला नाही. या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते अक्षरशः तलावात रूपांतरित झाले आहेत.
नरेंद्र नगर अंडरब्रिज आणि सोमलवाडा अंडरब्रिज पूर्णतः जलमय झाले असून, दोन्ही ठिकाणी ५ फूटांहून अधिक पाणी साचले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी या दोन्ही आरयूबी (रेल्वे अंडरब्रिज) वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
रेल्वे स्टेशन देखील जलमय-
नागपूर रेल्वे स्थानकावरही पावसाचे मोठे परिणाम दिसून आले. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ पूर्णपणे पाण्यात बुडाले आहेत, जेथे नेहमी मालगाड्यांचे ये-जा सुरू असते. तसेच दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरही पाणी पटरीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे काही वेळ ट्रेन्सची वाहतूक विस्कळीत झाली.
शहरातील इतर भागांतील स्थिती गंभीर-
शहरातील कॉटन मार्केट येथील लोखंडी पूल पाण्याखाली गेला असून, तिथे एक बस देखील अडकली आहे. पडोले चौक, शंकर नगर, गिट्टीखदान, हिंगणा रोड आणि मेडिकल चौक परिसरातही मोठ्या प्रमाणावर जलसंचय झाला आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मनपाचे पथक सक्रिय-
जलभरावामुळे नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने रेस्क्यू पथक तैनात केले आहेत. अनेक ठिकाणी नाले ओव्हरफ्लो झाल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.
हवामान विभागाचा इशारा-
हवामान विभागाने बुधवारी सुरुवातीला ‘येलो अलर्ट’ जारी केला होता. मात्र परिस्थिती अधिक गंभीर होत चालल्यामुळे आता पुढील २४ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.