Published On : Thu, Aug 26th, 2021

थकीत पाणी बिल वसुली तातडीने करा

स्थायी समिती सभापतींचे निर्देश : झोननिहाय वसुलीचा घेतला आढावा

नागपूर : मनपाच्या उत्पन्न स्रोतामध्ये पाणीपट्टी हे एक महत्त्वाचे स्रोत आहे. कोरोनामुळे वसुली मोठ्या प्रमाणात थकली आहे. शासकीय विभागांकडेही कोट्यवधी रुपये बिलापोटी थकीत आहेत. ही वसुली तातडीने करा. वेळोवेळी सूचना देऊनही पाणी बिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांकडे सातत्याने पाठपुरावा करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी दिले.

थकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात जलप्रदाय विभागाचा आढावा त्यांनी घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गुरुवारी (ता.२६) आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे अधिकारी, जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूचे डेलिगेट्स उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक झोनच्या डेलिगेट्सनी पाणीपट्टी वसुलीची माहिती दिली. झोपडपट्टी भागात बिल वसुली करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी प्रत्येक झोनच्या डेलिगेट्सनी दिली.कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांनी सांगितले की, जलप्रदाय विभागाकडे ३.८३ लाख ग्राहकांची नोंद आहे. या मधून १.९४ लाख ग्राहकांकडे पाणी पुरवठा विभागाच्या मागील बिल थकीत आहे. ही रक्कम १८९.३७ कोटी आहे. आतापर्यंत ६१.७२ कोटीची वसूली झाली आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट पर्यंत ५३.३७ कोटी वसूली झाली होती. यावर्षी वसूली मध्ये ८ कोटींनी पुढे आहोत, असेही ते म्हणाले.

स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर म्हणाले, पाणी बिल वसुलीसाठी आता प्रत्येक झोनमध्ये जाऊन आढावा घेण्यात येईल. आपल्याकडून जशा समस्या मांडल्या गेल्या, तशा नगरसेवकांच्या काय अडचणी आहेत, हे सुद्धा जाणून घेतले जाईल. बिल वसुलीमध्ये नगरसेवकांची मदत घेता येईल का, त्याचा वसुली वाढण्यावर परिणाम होऊ शकेल काय, याचीही चाचपणी केली जाईल. यानंतर महापौरांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन थकीत वसुली वाढविण्यावर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शासकीय पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकीत असेल तर ती कशाप्रकारे त्याची वसुली करता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. वीज जशी गरजेची आहे, तसेच पाणीसुद्धा अत्यावश्यक गरजेच्या बाबींमध्ये मोडते. पाणी बिलाची वसूली वाढवा, असेही निर्देश सभापती भोयर यांनी यावेळी दिले.