Published On : Mon, Jul 23rd, 2018

दुमदुमली पंढरी; विक्रमी १५ लाख विठ्ठलभक्तांची उपस्थिती

Advertisement

पंढरपूर : विठूनामाच्या गजरात शेकडो मैल पायी चालत पंढरीत पोहोचलेल्या लाखो विठ्ठलभक्तांनी चंद्रभागेत स्थान करून आज आषाढी एकादशीदिनी आपल्या लाडक्या विठुमाऊलीचे दर्शन घेतले. अतिशय शांततेत आणि भक्तिमय वातावरणात विक्रमी १५ लाख विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा आजचा महासोहळआ संपन्न झाला. विठ्ठलपूजेसाठी मुख्यमंत्र्यांना येता न आल्याने शासकीय महापूजेचा मान सर्वसामान्य वारकरी जाधव दांपत्याला मिळाला.

महापूजेचा मान मिळालेले अनिल जाधव आणि वर्षा जाधव हे हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत. ही महापूजा होत असताना राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी शासकीय पूजेत भाग न घेता बाजूला उभे राहत हा सोहळा पाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावर्षीच्या विक्रमी यात्रेमुळे विठुरायाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून तब्बल आठ किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. यामुळे दर्शनासाठी मोठा विलंब लागत होता. आज पहाटे १ वाजल्यापासून लाखोंच्या सख्येने विठ्ठलभक्त चंद्रभागा स्नानासाठी दिंड्या घेऊन बाहेर पडलेले दिसत होते. चंद्रभागेतील पवित्र स्नान करून या दिंड्यांनी नगरप्रदक्षिणा घालत कळसाचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच चंद्रभागेच्या तीरावर लाखों भाविकांमुळे अवघे वाळवंट फुलून गेले होते.

आषाढी सोहळ्याला फारच कमी भाविकांना दर्शन रांगेत तासनतास उभे राहिल्यानंतर देवाच्या पायापर्यंत पोचता येते. काही भाविक मुखदर्शन घेऊन समाधान मानतात. मात्र. लाखोंच्या संख्येनी आलेला हा वारकरी देवाच्या कलशात विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद घेत असतो.

आज दुपारी परंपरेप्रमाणे विठुरायाच्या रथ प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत या रथावर खारीक खोबरे आणि बुक्क्याची उधळण करीत रथातील विठुरायाचे दर्शन घेतले. ज्या भाविकांना मंदिरात दर्शन मिळत नाही त्यांना दर्शन देण्यासाठी देव प्रदक्षिणा मार्गावर रथातून येतो अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा असून गेल्या अनेक वर्षांपासून देवाच्या रथाची परंपरा सुरु आहे .

वारकरी दांपत्याला एसटीचा मोफत पास
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाधव दांपत्याला वर्षभर मोफत एसटी प्रवासाचा पास देऊन त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे महापूजेचा मान वारकरी संप्रदायाला मिळाला असे सांगत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वांना आरक्षण मिळो असे साकडे आपण विठुरायाला घातल्याचे सांगितले.

वारकरी दांपत्याच्या हस्ते ‘रिंगण’चे प्रकाशन
आषाढी सोहळ्यानिमित्त पत्रकार सचिन परब संपादित ‘रिंगण’ मासिकाच्या संत गोरा कुंभार या विशेषांकाचे प्रकाशन मानाच्या वारकरी दांपत्याच्या हातून करण्यात आले. आषाढी यात्रेनिमित्त वारकरी संप्रदायातील संतांचा जीवनपट उलघडून दाखविल्याचे काम जेष्ठ पत्रकार सचिन परब हे करीत आले आहेत. हा सहावा आषाढी विशेषांक असून पुढच्या वर्षी श्रमात देव पाहणारे संत सावतामाळी यांच्यावर अंक निघणार असल्याचे सचिन परब यांनी सांगितले .