Published On : Wed, Apr 26th, 2017

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्व प्रयत्न करणार

Ashwin Mudgal
नागपूर: नागपुरात सुरू असणारे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची गरज आहे. यातही नागरी प्रकल्प अग्रक्रमाने पूर्ण करण्यावर आपला भर राहील. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्याने आपल्या कार्यकाळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार. नागरिकांना विश्वासात घेऊन राजकीय प्रतिनिधींच्या सहकार्यातून प्रकल्प वेगाने पूर्ण होतील, अशी ग्वाही नवे आयुक्त अश्विन मुद्गल यांनी दिली.
बुधवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे आय़ुक्त म्हणून मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.

२००७ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले मुद्गल हे परीविक्षाधीन कालावधीत नाशिक येथे होते. त्यानंतर ​सांगली येथे जिल्हा परिषदेचे सीईओ, यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि गेल्या अडीच वर्षांपासून सातारा येथे ​जिल्हाधिकारी होते. आतापर्यंत महसूलमध्ये काम केल्याचा अनुभव पाठिशी होता. स्थानिक स्वराज्य संस्थेतील मनपात त्यांना पहिलीच नियुक्ती आहे. त्यामुळे नवे काम, नवे प्रकल्प व आव्हाने असतील हे मानूनच पहिल्या दिवसापासून कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर शहर ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्टया अत्यंत महत्वाचे आहे. शहराची ही ओळख जपून काम करावे लागेल. या शहराला विकासाचा नवा चेहरा देण्याचा प्रयत्न राहील. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांचे शहर असतानाच देशाचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे काम करताना दीर्घकालीन विचार करूनच प्रकल्प पूर्ण करावे लागणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. केंद्र सरकारने शहराच्या विकासासाठी दिलेले कार्यक्रम पूर्ण जोमाने राबविण्याचाही प्रयत्न राहील. नव्या कल्पना व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सन्मान करण्यात येईल. या शहरात काम करण्याची संधी मिळत असल्याने, शहरात मुलभूत सुविधा व नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यात मनपा कुठेही कमी पडणार नाही. कुठलेही प्रकल्प व काम करताना ते दर्जात्मक असेल याची दक्षता घेतली जाईल. आपला पुढील कार्यकाळ शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी असेल, अशी ग्वाहीही मुद्गल यांनी ​यावेळी दिली.