Published On : Mon, Sep 4th, 2017

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव सज्ज

Advertisement

नागपूर : गणेश विसर्जनासाठीची तयारी पूर्ण झाली असून महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेश विसर्जनासाठी सज्ज असलेल्या शहरातील कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडाची पाहणी आणि विसर्जन तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल यांनी सोमवारी (ता. ४) दौरा केला.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, उपसभापती प्रमोद कौरती, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षदा साबळे, नगरसेवक सुनील हिरणवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल यांनी सक्करदरा तलावाची पाहणी केली.यावेळी दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे उपस्थित होते. सक्करदरा तलावात एकही गणपती विसर्जित होणार नाही याची काळजी घ्यावी.कृत्रिम तलाव भरल्यानंतर त्यातील गाळ लगेच काढण्यात यावा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.सक्करदरा तलावाच्या परिसरात २० कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेहरूनगर झोनमध्ये ६० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असल्याची माहिती झोन सहायक आयुक्त राजेश कराडे यांनी दिली. ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे, तसेच विद्युत व्यवस्थाही सज्ज करण्यात यावी, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. सक्करदरा, गांधीबाग तलावाच्या संपूर्ण बाजुनी टिनाचे अस्थायी कुंपन लावण्यात आले आहे. जेणेकरून तलावात कोणतेही गणपती विसर्जित होणार नाही. तलावाचे पाणी दुषित होणार नाही व पर्यावरणाचे रक्षण होईल याची दक्षता घेण्यात येत आहे.

गांधीसागर तलावाची पाहणी करताना धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, धंतोली झोन सहायक आयुक्त गणेश राठोड माजी नगरसेवक मनोज साबळे उपस्थित होते. येथील कृत्रिम स्थायी तलावाचे मान्यवरांनी कौतुक केले. नागपूरचे श्रीमंत राजे भोसले यांचा परंपरागत असलेला मानाचा गणपती गांधीसागर येथील कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात आला.

यानंतर उपमहापौर दीपराज पार्डीकर व आयुक्त अश्विन मुदगल यांनी फुटाळा तलावाची पाहणी केली. यावेळी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते. फुटाळा तलावातील विसर्जनाचा भाग स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते विसर्जनापूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती सहायक आयुक्त मोरोणे यांनी दिली. फुटाळा तलावात एकही लहान मूर्ती विसर्जित होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी. जे जबरदस्तीने विसर्जन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी द्या, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. यावेळी ग्रीन व्हिजीलचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल उपस्थित होते. अंबाझरी तलावाची पाहणी करताना तेथील यानंतर मान्यवरांनी सोनेगाव तलावाची पाहणी करून गणेश विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.

गणेश विसर्जनासाठी नागपूर महानगर पालिकेने नागपूर शहरात ठिकठिकाणी १९७ कृत्रिम तलाव उभारले आहे.विसर्जन तलावाजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक सज्ज केले आहे. विदर्भ सर्पमित्र मंडळ व रिव्हॉन या संस्थेचे ४० जलतरणपटू फुटाळा तलाव व गांधीसागर तलाव येथे कार्यरत आहेत. याशिवाय नागपूर महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे एक हजार कर्मचारी व अग्निशमन विभागाचे २०० कर्मचारी अहोरात्र काम करणार आहेत. विसर्जन स्थळी रूग्णवाहिका व डॉक्टरची व्यवस्थाही राहणार आहे. ठिकठिकाणी निर्माल्येकुंड व मोबाईल विसर्जन व्हॅनही ठेवण्याचे आदेश आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले आहे. अंबाझरी तलावाची पाहणी केल्यानंतर मान्यवरांनी स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट दिली. तेथील स्वच्छेतेचा व सुरक्षेचा आढावा घेतला.