नागपूर : शहारत गुन्हे शाखेच्या पथकाने एक्सेल युनिसेक्स सलूनमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मंगळवार, ११ मार्च रोजी प्रताप नगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पन्नासे लेआउट येथील सावरकर चौकात असलेल्या एक्सेल युनिसेक्स सलूनवर छापा टाकून गुन्हे शाखा युनिट १ ने ही कारवाई केली.
देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि महिलांना या व्यवसायात ढकलणे या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना अटक केली. भरत प्यारेलाल कश्यप (३५) आणि संजय उमाजी आस्तीकर (५२) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सलूनमधून दोन महिलांची सुटका केली आणि त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन, १९,६०० रुपये रोख आणि ७५,६३० रुपयांचे इतर साहित्य जप्त केले.
या प्रकरणी प्रताप नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आणि पुढील चौकशीसाठी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.