
नागपूर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून ‘टीम महाराष्ट्र’ची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत विदर्भाला विशेष स्थान देण्यात आले आहे.
जळगाव-जामोदचे आमदार संजय कुटे यांची प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार परिणय फुके आणि माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्याकडे प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जंबो कार्यकारिणीची घोषणा-
दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ४ महासचिव आणि १२ सचिवांचा समावेश आहे. यासोबतच विविध पक्षीय मोर्चांच्या अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली.
विदर्भातील अन्य नेत्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. माजी खासदार रामदास तडस यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, आमदार प्रवीण पोटे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच गडचिरोलीचे माजी आमदार देवराम होळी यांच्याकडे भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
सर्वांना पद देणे शक्य नव्हते-
नावांची घोषणा करताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, अनेक इच्छुकांनी संघटनात काम करण्याची तयारी दर्शविली होती; मात्र पदांची संख्या मर्यादित असल्याने सर्वांना संधी देणे शक्य झाले नाही. तरीही सर्व कार्यकर्ते आणि नेते एकजुटीने काम करून राज्यात पक्ष अधिक बळकट करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्या कार्यकारिणीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक हालचालींना वेग येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.








