मुंबई : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोणत्या नेत्याची निवड होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.
पूर्वीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांच्यावर कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद अद्याप सोडलेले नाही.
दरम्यान रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग 4 वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निडवणुकीत त्यांनी 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं होतं.