Published On : Sat, Sep 2nd, 2017

राष्ट्रवादी मोदींच्या आॅपरेशन टेबलवर – प्रकाश आंबेडकर

Advertisement

अहमदनगर : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात. काँग्रेस स्वत: काही करत नसल्याने त्यांनी निदान डाव्यांच्या आंदोलनांना साथ द्यायला हवी. त्यातून भविष्यात काँग्रेसला फायदाच होईल, असे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
भटक्या विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेसाठी आंबेडकर नगर जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय टीमशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेतृत्वानेच आपल्या नेत्यांना शांत राहण्याचा आदेश दिला आहे की काय, अशी शंका वाटावी असे वातावरण आहे.

चौकशीचा ससेमिरा पाठीशी लागण्याची भीती असल्यामुळे विरोधक म्हणून ते काहीच करत नाहीत. तर संपूर्ण राष्ट्रवादीच मोदींच्या ‘आॅपरेशन’ टेबलवर आहे. आॅपरेशन करुन हा पक्ष संपवायचा की जीवंत ठेवायचा हे मोदींच्या हातात आहे.

त्यामुळे राष्टÑवादी भाजपविरोधात काहीच करु शकत नाही़ राज्यात भाजप विरोधात आघाडी उभी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
राजू शेट्टींसह सर्वांचे यात स्वागत राहील. मात्र, शेट्टी भाजपशी पूर्ण काडीमोड घेणार की नाही हे
अजून स्पष्ट नाही, असे आंबेडकर म्हणाले.

चळवळीतूनच मिळेल पंतप्रधानपदाचा चेहरा
आत्ताच्या परिस्थितीत मोदींना सक्षम पर्र्याय देऊ शकेल, असा पंतप्रधान पदाचा चेहरा कुठल्याही पक्षाकडे नाही. नितीश कुमार यांची चर्चा होती, पण त्यांनी स्वत:ला त्यादृष्टीने कधीच तयार केले नव्हते. आता तर ते मोदींच्या तंबूत गेले आहेत. लालूप्रसाद निवडणूक लढवू शकत नाहीत. मायावती मोदींच्या विरोधात जातील, असे नाही. काँग्रेसकडेही सध्या हा चेहरा नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात जी जनआंदोलने उभी राहतील, त्यातूनच एखादा चेहरा समोर येईल. गुजरात निवडणुकीवर पुढील सर्व गणिते अवलंबून आहेत, असे भाकीत त्यांनी केले.

सत्तेतील दलित नेत्यांचा समाजाला फायदा नाही
केंद्रात रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळून दलितांचा काहीही फायदा झालेला नाही. रा.सू. गवई, दादासाहेब रुपवते, सुशीलकुमार शिंदे सत्तेत होते. त्यामुळे दलित समाजाचा काय फायदा झाला? कोणी मंत्री झाला म्हणून समाज सुधारतो असे नाही.