
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूरच्या नारा परिसरात घडली असून, कापिलनगर पोलिसांनी अजय झोटिंग (वय ३०, रा. नारा) या आरोपीविरुद्ध बलात्कार व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनीची आरोपीशी दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर नात्यात झाले. ६ नोव्हेंबर रोजी मुलगी घरात एकटी असताना आरोपी झोटिंग तिच्या घरी आला. त्याने लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यानंतर, हा प्रकार उघड केल्यास तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. या घटनेचा धक्का बसलेल्या पीडित मुलीने अखेर सर्व घडलेले आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी कापिलनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.










