Published On : Thu, May 11th, 2017

रावसाहेब दानवेंची भाषा ‘दानवा’सारखीः खा. अशोक चव्हाण

Ashok Chavan

File Pic

मुंबई: राज्यातील तूर उत्पादक शेतक-यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करित आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करित आहेत. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते वारंवार शेतक-यांचा अवमान करत आहेत. आता तर शेतक-यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

शेतक-यांना साले म्हणून संबोधणा-या दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार असून दानवे यांना “साला दानवे” अशी पदवी काँग्रेसकडून देण्यात येणार आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.