Published On : Sat, Mar 3rd, 2018

नारायण राणेंना राज्यसभेची ऑफर अमान्य

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीत भाजपाने नारायण राणे यांना राज्यसभेवर पाठविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. मात्र, नितेश राणे यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटमुळे राणे यांना राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नितेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राणे साहेबांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणातच राहावे, अशी माझ्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. महाराष्ट्राला त्यांची आणखी गरज आहे. त्यामुळे राणे साहेबांनी राज्यसभा नव्हे तर विधानसभेत जावे, अशी आमची इच्छा आहे. राणेसाहेब आमची ही मागणी लक्षात घेतील, अशी आशा करतो. आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत, असे नितेश यांनी म्हटले आहे.

दिल्लीत दोन दिवसांपूर्वीच नारायण राणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात तासभर बैठक झाली. या बैठकीत काय घडले हे त्यादिवशी समजले नव्हते. पण बैठकीनंतर नारायण राणे समाधानी असल्याचे दिसले त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल किंवा राज्यसभेवर पाठवले जाईल अशा चर्चा रंगल्या होत्या. भाजपाकडून राज्यसभेची ऑफर आहे हे दस्तुरखुद्द नारायण राणेंनीच स्पष्ट केले. मात्र, ही ऑफर स्वीकारणार की नाही याचे उत्तर राणेंनी दिले नव्हते.

२३ मार्चला महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर भाजपाला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येतील. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजपा कुणाला राज्यसभेवर पाठविते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राणे, जावडेकर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा असल्या, तरी ३ मार्च रोजी केंद्रीय निवड समितीची बैठक होणार असून, त्यात या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.