Published On : Thu, Mar 7th, 2024

रामझुला मर्सडिज अपघात; ‘त्या’ महिलेविरोधात कोर्टात जामीन रद्द करण्यासाठी नागपूर पोलिसांकडून ‘तारीख पे तारीख’!

Advertisement

नागपूर : बॉलीवुडचा कल्ट-क्लासिक चित्रपट असलेल्या दामिनीमधील “तारीख पे तारीख” हा डायलॉग नेहमी आपल्या न्यायप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आलेला आहे.मात्र आता नागपूर पोलिसांकडून हाच “तारीख पे तारीख” फॉर्म्युला रामझुल्यावरील मर्सिडीज अपघातातील आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालूचा जामीन रद्द करण्यासाठी वापरला जात असल्याचे प्रतीत होते.

२५ फेब्रुवारीला शहरातील रामझुला ओहरब्रिजवर महिला चालवत असलेल्या भरधाव मर्सडिजखाली येऊन दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34, रा.नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (34, रा. जाफरनगर, अवस्थी चौक) असे मृतांचे नाव आहे. तर माधुरी शिशिर सारडा (37, वर्धमान नगर) आणि रितिका ऊर्फ रितू दिनेश मालू (39, रा.देशपांडे ले-आउट) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. यातील रितू मालू ही महिला कार (एमएच/49/एएस/61111) चालवत होती. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी हे उच्चभ्रू परिवारातल्या असल्याने तिला पोलिसांनी 24 तासाच्या आता जामीनही मंजूर केला. यादरम्यान आरोपी महिला चालक रितू मालू हिच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. विशेष म्हणजे रक्तात अल्कोहोल असल्याची पुष्टी झाल्यानंतरही पोलिसांनी 304 (A) वरून 304 मध्ये बदल करण्यासाठी तसेच न्यायालयाला यासंदर्भाची माहिती देण्यासाठी 48 तास प्रतीक्षा केली. याला आता एक आठवडा उलटून गेला आहे, तरीही पोलिसांनी अद्याप जामीन रद्द करण्याचा अर्ज दाखल केलेला नाही.

नागपूर टुडेशी‘ या संदर्भात बोलताना पोलीस उपायुक्त (डीसीपी) झोन 3 गोरख भामरे यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलीस आजच जामीन रद्द करण्याचा अर्ज दाखल करणार आहेत.

तत्पूर्वी, नागपूर टुडेशी बोलताना राम झुला येथील खळबळजनक मर्सिडीज अपघाताचे प्रत्यक्षदर्शी मयुरेश भूषण दडवे यांनी नागपूर टुडेशी बोलताना अपघाताच्या रात्री काय घडले यासंदर्भात माहिती दिली.आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालू आणि माधुरी शिशिर सारडा यांच्या साथीदारांनी राम झुला येथून दारूच्या बाटल्या फेकल्याची पुष्टी त्यांनी केली.मात्र, नागपूर पोलिसांच्या ‘तारीख पे तारीख’ या डावपेचात एका प्रभावशाली व्यक्तीचा समावेश असल्याने तपास आणि कारवाईच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

– शुभम नागदेवे