
रामटेक-तुमसर राज्य महामार्ग क्रमांक ७५३ वर मुरमुरा भट्टीजवळील समाधान बाईक सर्विसिंग सेंटरसमोर झालेल्या भीषण अपघातात एका ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिची १७ वर्षीय नात गंभीर जखमी झाली आहे. १९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विशेष म्हणजे, दुचाकी चालवणारी मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आल्याने या घटनेने पालकांच्या जबाबदारीचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारशिवनी तालुक्यातील बोरडा (गणेशी) येथील १७ वर्षीय आर्या परमेश्वर हारोडे आणि तिची आजी रायाबाई मोतीलाल नानुरे, वय अंदाजे ६१ वर्षे, उपचारासाठी रामटेक येथील श्रीराम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या.
उपचारानंतर दोघी दुचाकीने बोरडा येथे परत जात असताना रामटेक-तुमसर राज्य महामार्ग क्रमांक ७५३ वरील मुरमुरा भट्टीजवळील समाधान बाईक सर्विसिंग सेंटरसमोरील वळणावर तुमसरकडून मनसरच्या दिशेने जाणाऱ्या तनस भरलेल्या अज्ञात आयसर ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक झाली.
या अपघातात दुचाकी चालवत असलेल्या आर्या हिला गंभीर दुखापत झाली, तर दुचाकीवर मागे बसलेल्या तिच्या आजी रायाबाई नानुरे या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने दोघींनाही रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रायाबाई नानुरे यांना मृत घोषित केले. जखमी आर्या हिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर तनस भरलेला अज्ञात ट्रक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार वाहनाचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.
पालकांसाठी महत्त्वाचा संदेश :
या अपघाताच्या निमित्ताने अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
शहर असो किंवा ग्रामीण भाग… अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले सर्रास दुचाकी चालवताना दिसून येतात. काही वेळा पालकांच्या परवानगीने तर काही वेळा पालकांच्या नकळत मुले वाहने चालवतात. मात्र, वाहन चालवण्याचा अनुभव आणि वाहतुकीचे नियम याबाबत पुरेसे ज्ञान नसल्याने अशा चुका जीवघेण्या ठरू शकतात.
पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणे टाळणे गरजेचे आहे.
तर मुलांनीही वाहन चालवण्याचा हट्ट न धरता स्वतःसह रस्त्यावरच्या इतरांच्या जीवाची जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.
एका क्षणाचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे नियम पाळा, अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नका आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या.
प्रतिनिधी अजय मेहरकुळे रामटेक




