
नागपूर : राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकाविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर रामटेक पोलिसांनी पोलीस कर्मचारी अजय सदाशिव सलामे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने सलामे याने लग्नाचे आमिष दाखवून आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच आपले छायाचित्र आणि चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांची भेट घेऊन तक्रार केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर रामटेक पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
अजय सलामे हा यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांचाही अंगरक्षक म्हणून कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात सलामे याच्यासह एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप दोन्ही आरोपींना अटक झालेली नसून, रामटेक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



