
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2025-26 च्या निवडणुकांसाठीच्या नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस प्रचंड उत्साहात पार पडला. उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत मोठ्या जल्लोषात आपापली नामनिर्देशने दाखल केली. मात्र महायुतीमधील अंतर्गत बंडखोरीमुळे रामटेकसह नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत.
रामटेक नगर परिषद, पारशिवनी नगर पंचायत, कांद्री नगर पंचायत आणि कन्हान नगर परिषद या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकूण 74 नगरसेवक पदे आणि 4 नगराध्यक्ष पदांसाठी तब्बल 466 उमेदवारांनी कडक पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल केले.
नामनिर्देशन प्रक्रियेबरोबरच महायुतीतील नाराजगीही उफाळून आली. पारशिवनी, कन्हान, कांद्री आणि रामटेकमध्ये पक्षाच्या निर्णयावर नाराज झालेल्या बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांविरोधात उघडपणे रान उठवले आहे. त्यामुळे चारही नगरपरिषदांमध्ये महायुतीचे गणित विस्कटताना दिसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीत निर्दलीयांसाठी 194 निवडणूक चिन्हे, तर राष्ट्रीय पक्षांच्या 5 आणि राज्यस्तरीय पक्षांच्या 9 चिन्हांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ही बंडखोरी पुढे किती चिघळते आणि त्याचा निवडणूक निकालांवर कसा परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










