
नागपूर – शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने नागपूर महानगरपालिकेने मोठी आगेकूच केली आहे. पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीकडे वाटचाल करत ‘आपली बस’ ताफ्यात नव्या २९ पीएम ई-बसांचा समावेश करण्यात आला आहे. आरटीओची आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच या एअर-कंडिशन्ड, अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस शहराच्या मार्गांवर धावू लागतील.
सध्या नागपूरमध्ये २६० ई-बसांचा ताफा प्रवाशांना सेवा देत आहे. त्यात नव्याने समाविष्ट झालेल्या २९ बसांमुळे मनपाची हरित वाहतूक प्रणाली आणखी बळकट झाली आहे. केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूरला १५० इलेक्ट्रिक बसांचा कोटा मिळाला असून त्यातील पहिली खेप कोराडी डेपोला हस्तांतरित करण्यात आली आहे. उर्वरित बस पुढील एका वर्षात टप्प्याटप्प्याने शहरात दाखल होतील.
योजनेअंतर्गत कोराडी आणि खापरी या दोन्ही डेपोंचा विस्तार आणि आधुनिकीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. कोराडी डेपो पूर्णपणे सज्ज झाला असून खापरी डेपोचे काम अंतिम टप्प्यात आहे. डेपोकरिता वीजपुरवठा, चार्जिंग सुविधा आणि इतर संरचनात्मक सोयी केंद्राकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
नव्या ई-बसांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग प्रवाशांसाठी बसवण्यात आलेली रिमोट-ऑपरेटेड लिफ्ट. यामुळे बससेवा अधिक समावेशक, सुलभ आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध होणार आहे. नागपूरच्या ई-मोबिलिटी मॉडेलला मिळालेली ही नवी ऊर्जा, शाश्वत आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीकडे शहराची वाटचाल आणखी वेगवान करणार आहे.









